जर्मनीतील डाव्या गटांनी ढोंगी असहिष्णु भूमिका सोडून द्यावी

- संसद सदस्य सारा वागक्नेश्ट यांनी फटकारले

बर्लिन – जर्मनीतील डाव्या विचारसरणीचे पक्ष व गटांनी आपली ढोंगी, असहिष्णु भूमिका सोडली नाही तर जर्मनीतही अमेरिकेप्रमाणे टोकाची दुफळी असणारे वातावरण तयार होईल, असा खरमरीत इशारा संसद सदस्य सारा वागक्नेश्ट यांनी दिला आहे. जर्मनीतील आघाडीचे दैनिक असणार्‍या ‘दी वेल्ट’ला दिलेल्या मुलाखतीत वागक्नेश्ट यांनी डाव्या विचारसरणीविरोधात ताशेरे ओढले. त्याचवेळी २०२० साली जगातील आघाडीच्या बुद्धीमंतांनी वैचारिक मतभेदांची तीव्रता वाढत असल्याचे बजावले होते, याकडेही लक्ष वेधले. सारा वागक्नेश्ट या जर्मनीतील डाव्या पक्षाच्या आघाडीच्या व लोकप्रिय नेत्या म्हणून ओळखण्यात येतात. २००९ सालापासून जर्मन संसदेच्या सदस्य असणार्‍या वागक्नेश्ट यांनी डाव्या पक्षाच्या संसदीय गटाचे प्रमुख पद भूषविले आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांनी डाव्या पक्षाअंतर्गत ‘स्टँड अप’ ही स्वतंत्र चळवळ सुरू करून खळबळ उडविली होती. जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यावर्षी आपल्या पदावरून पायउतार होत असून, जर्मन राजकारणात मोठ्या उलथापालथी होण्याचे संकेत देण्यात येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर डाव्या पक्षाच्या प्रभावशाली नेत्या असणार्‍या वागक्नेश्ट यांनी स्वपक्षियांसह डाव्या गटांना धारेवर धरणे लक्ष वेधून घेणारे ठरते.

‘जर्मनीतील कथित डाव्या उदारमतवादी विचारसरणीच्या गटांमधील वाढती असहिष्णुतेमुळे या देशाला गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. आपल्यापेक्षा वेगळ्या भूमिका घेणार्‍यांना नाझी म्हणून त्यांची हेटाळणी करायची ही बाब अतिशय घातक ठरते. डावे उदारमतवादी गट आता साचेबद्ध भूमिका घेऊ लागले आहेत. स्थलांतरणाला विरोध करणारा वंशद्वेषी, कार्बनडायऑक्साईडवरील करांना विरोध दर्शविणारे म्हणजे हवामानबदल नाकारणारे आणि शाळा, रेस्टारंट बंद ठेवण्यास समर्थन न देणारे कोव्हइडियट; अशा व्याख्या करून विरोधकांना चौकटीत बंद करण्याचे उद्योग सुरू आहेत’, या शब्दात वागक्नेश्ट यांनी डावे पक्ष व डाव्या विचारसरणीच्या समर्थकांना फटकारले आहे.

जर्मनीतील डाव्या विचारसणीचे गट अत्यंत ढोंगी प्रवृत्तीचे असून त्यामुळे डाव्या पक्षाने मोठ्या प्रमाणात मतेही गमावली असल्याची जाणीव संसद सदस्य वागक्नेश्ट यांनी करून दिली. ‘देशाच्या मोठ्या शहरांमध्ये वाढलेला व राहणारा शिक्षित वर्ग डाव्या विचारसरणीचे समर्थन करीत आहे. पण हा वर्ग विशिष्ट कोषात वाढलेला व आपल्या विशेषाधिकारांना जपणारा वर्ग आहे, हे लक्षात ठेवायला हवे’, असे सांगून या वर्गाचा डाव्या पक्षांच्या वाढीसाठी काहीच लाभ नसल्याचे वागक्नेश्ट यांनी बजावले.

‘जर्मनीला आपला देश मानून त्याच्या हितसंबंधांची काळजी करणार्‍या गटांमध्ये परंपरावादी विचारसरणीच्या गटांपासून ते डाव्या गटांपर्यंत सर्वांचा समावेश होतो. त्यांना आपल्या देशात अमेरिकेप्रमाणे दुफळी व्हावी असे वाटत नसून, अशांनी पुढे येऊन परस्परांचा आदर ठेऊन संवाद व चर्चेचा मार्ग स्वीकारायला हवा’, असे आवाहनही संसद सदस्य सारा वागक्नेश्ट यांनी केले. जर्मनीतील डाव्या पक्षाने व त्याच्या समर्थकांनी दुसर्‍यांना नैतिकतेचे धडे शिकविणे तसेच विरोधकांना सामाजिक वर्तुळातून बहिष्कृत करण्याची संस्कृती राबविणे बंद करावे, असा कठोर सल्लाही वागनेक्श्ट यांनी दिला आहे.

leave a reply