वॉशिंग्टन – ‘ज्यो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अमेरिका सामाजिक समस्यांचे तथाकथित भान असणार्या डाव्या विचारसरणीच्या गटाच्या ताब्यात जाईल. ही संपूर्ण अमेरिकेसाठी अत्यंत चिंतेची बाब ठरते. हे गट स्वातंत्र्याच्या नावाखाली अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी करतील आणि समानतेच्या नावाने भेदभाव करणारी धोरणे लागू करतील. हे सारे योजनाबद्धरित्या घडविले जाईल, त्याचा अमेरिकेच्या आजवरच्या ध्येयधोरणांशी संबंध नसेल, असा इशारा अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रसंघातील माजी राजदूत निक्की हॅले यांनी दिला.
अमेरिकेतील प्रमुख राजकीय पक्षांपैकी एक असलेल्या ‘डेमोक्रॅटिक पार्टी’मध्ये गेल्या काही वर्षात डाव्या व समाजवादी विचारसरणीच्या धोरणांचा पुरस्कार करणार्यांची संख्या वाढत असल्याचे समोर आले आहे. अमेरिकेतील कृष्णवर्णियांवर होणारी कारवाई, निर्वासितांचे लोंढे, शस्त्र बाळगण्याचा अधिकार(गन राईट्स), पर्यावरण, समानता यासारख्या मुद्यांवर या गटाकडून टोकाची भूमिका घेण्यात येत आहे. गेल्या महिन्यात झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटस् पक्षाचे ज्यो बिडेन यांना विजय मिळाला असून, संसदेच्या कनिष्ठ सभागृहात आघाडी कायम राखण्यातही पक्ष यशस्वी ठरला आहे. पुढील काळात हाच गट राष्ट्राध्यक्ष बिडेन यांच्यावर दबाव टाकून आपली धोरणे राबविण्यास भाग पाडेल, असे संकेत मिळू लागले आहेत.
रिपब्लिकन पक्षातील प्रमुख नेत्या म्हणून समोर येत असलेल्या निक्की हॅले यांनी याच धोक्याकडे लक्ष वेधले आहे. अमेरिकेच्या राजकीय विचारधारेत समाजवाद मुख्य प्रवाहात आला आहे आणि त्यासाठी २०२० हे साल ओळखले जाईल, असे हॅले यांनी म्हटले आहे. ‘समाजवाद ही अत्यंत धोकादायक विचारसरणी आहे. जगात ज्या भागात याचा वापर झाला तिथे ती सपशेल अपयशी ठरली आहे आणि त्याने असंख्य लोकांचे बळी घेतले आहेत. आता हीच विचारसरणी डेमोक्रॅटिक पक्षाच्या आर्थिक धोरणांचा केंद्रबिंदू बनली आहे. हा कल अतिशय गंभीर असून अमेरिकी जनतेच्या भविष्यासाठी धोक्याचे संकेत आहेत’, असे हॅले यांनी बजावले.
बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अमेरिकी जनतेला पुन्हा एकदा भांडवलशाहीसाठी संघर्ष सुरू करावा लागेल, असा इशारा माजी गव्हर्नर हॅले यांनी दिला. ‘दांभिक गटांनी उदारमतवादी उच्चभू्रंना आपल्या मागे येण्यास भाग पाडले आहे. हे दांभिक स्वातंत्र्याची मागणी करतात, पण त्याचवेळी त्यांना विरोध करणार्यांना गप्प करण्यासाठी व त्यांच्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करतात. समानतेची मागणी करणार्या या गटाला खरे तर भेदभाव असणार्या नव्या समाजाची निर्मिती करायची आहे. आपली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी ते नव्या सरकारचा पुरेपूर वापर करणार आहेत’, याची जाणीव निक्की हॅले यांनी करून दिली.
डाव्या विचारसरणीचे गट अमेरिकेतील शाळांमध्ये ‘अमेरिकाविरोधी’ विचारसरणींचा जोरदार प्रसार करीत असून, उद्योगक्षेत्रानेही राजकीय भूमिकेवर आधारित निर्णय घ्यावेत यासाठी दबाव टाकत आहेत, असा घणाघाती आरोपही हॅले यांनी केला. हे चालू असतानाच अमेरिकेतील प्रमुख सोशल मीडियाही (बिग टेक) पारंपारिक विचारसरणी नाकारून डाव्यांचे विचार समाजावर लादण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका संयुक्त राष्ट्रसंघाच्या माजी राजदूतांनी केली.