बीजिंग – ‘तैवानचा प्रश्न सोडविणे हा चीनसमोरील मुद्दा असून त्याचे निराकरण चीनकडूनच करण्यात येणार आहे. आम्ही तैवानसाठी शांततामय मार्गाने व प्रामाणिकपणे पूर्ण प्रयत्न करु, पण लष्करी सामर्थ्याचा वापर करणार नाही असे वचन चीन देणार नाही. गरज पडल्यास सर्व प्रकारची कारवाई करण्याचा पर्याय चीनने राखून ठेवला आहे’, असा इशारा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिला. राजधानी बीजिंगमध्ये सुरू असलेल्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीच्या अधिवेशनात तैवानबाबत इशारा देतानाच अमेरिकेसह इतर देशांकडून होणाऱ्या हस्तक्षेपावरही टीकास्त्र सोडले. जिनपिंग यांच्या या वक्तव्यावर तैवानकडून प्रतिक्रिया उमटली. तैवानची जनता सार्वभौमत्त्वाच्या मुद्यावर कोणतीही तडजोड करणार नाही, असा इशारा तैवान सरकारकडून देण्यात आला आहे.
बीजिंगमध्ये सुरू असलेल्या अधिवेशनात जिनपिंग यांनी हॉगकाँगवरील ताब्याची चीनची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे जाहीर केले. त्याचवेळी तैवानसाठी सुरू असलेले प्रयत्न चीन थांबविणार नाही, असेही बजावले. तैवानचा मुद्दा हा चीनची एकजूट व सार्वभौमत्त्वाशी जोडलेला असून गेली अनेक वर्षे चीन तैवानमधील विघटनवादी शक्तींविरोधात संघर्ष करीत असल्याचा दावा चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी केला. तैवानसाठी बळाचा वापर करण्याचे संकेत देतानाच चीनच्या संरक्षणदलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनविण्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली. 2027 सालापर्यंत चिनी संरक्षणदलांच्या आधुनिकीकरणाची मोहीम पूर्ण होईल, असा दावाही जिनपिंग यांच्याकडून करण्यात आला.
कोरोनाच्या साथीविरोधात राबविण्यात आलेली ‘झीरो कोविड पॉलिसी’ व इतर निर्णयांमुळे चीनच्या अर्थव्यवस्थेत सध्या जोरदार उलथापालथी सुरू आहेत. जिनपिंग व कम्युनिस्ट पार्टीच्या निर्णयांमुळे चिनी जनतेतील असंतोष वाढत असल्याचे वृत्तही समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी जिनपिंग यांच्याविरोधातील कथित बंडाच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर यावेळी होणारे कम्युनिस्ट पार्टीचे अधिवेशन लक्षवेधी ठरले असून जिनपिंग त्याच्या माध्यमातून आपली पकड दाखविण्याचा प्रयत्न करतील, असा दावा विश्लेषकांकडून करण्यात येत आहे. तैवानविरोधात लष्करी बळाच्या पर्यायाबाबत दिलेला इशारा त्याचाच भाग दिसत आहे.