बीजिंग – कोरोना साथीचा फैलाव पुन्हा वाढण्याचे संकेत मिळाल्यानंतर, चीनची राजधानी बीजिंगच्या दक्षिणेस असणार्या हेबेई प्रांतातील दोन शहरांमध्ये ‘लॉकडाऊन’ची घोषणा करण्यात आली आहे. ‘शिजिआझुआंग’ व ‘शिन्गताई’ अशी या दोन शहरांची नावे असून त्यांची एकूण लोकसंख्या जवळपास दोन कोटी असल्याचे सांगण्यात येते. २०१९ सालच्या अखेरीस वुहानमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या साथीनंतर एकाच वेळी दोन शहरांमध्ये ‘लॉकडाऊन’ची घोषणा होण्याची ही पहिलीच वेळ मानली जाते. या घोषणेमुळे कोरोना साथीवर नियंत्रण मिळविल्याचा चीनच्या राजवटीचा दावा फसवा असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.
उत्तर चीनमधील हेबेई प्रांताची राजधानी असलेल्या शिजिआझुआंगमध्ये कोरोनाचे १००हून अधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या पाच महिन्यात चीनमधील प्रमुख शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. त्यामुळे चीनच्या यंत्रणांमध्ये खळबळ उडाली असून शिजिआझुआंग व त्याच्याजवळ असणार्या शिन्गताईमध्ये तातडीने ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आला. या शहरांमध्ये पाच हजारांहून अधिक ठिकाणी कोरोनाच्या चाचणीची व्यवस्था करण्यात आली असून सार्वजनिक ठिकाणी रसायनांची फवारणी करण्यात येत आहे.
लॉकडाऊनची मुदत निश्चित करण्यात आली नसून शहरातील सर्व नागरिकांची चाचणी झाल्यावर निर्णय घेण्यात येईल, असे संकेत चिनी अधिकार्यांनी दिले आहेत. पुढील महिन्यात चिनी नववर्ष सुरू होत असून, या पार्श्वभूमीवर कोरोनाची नवी प्रकरणे समोर आल्याने चीनच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. २०१९ सालच्या अखेरीस वुहान शहरातून कोरोनाची साथ पसरल्यानंतर काही महिन्यातच त्यावर नियंत्रण मिळविल्याचे दावे चीनच्या सत्ताधारी राजवटीने केले होते. काही महिन्यांपूर्वी वुहानसह चीनच्या अनेक शहरांमध्ये सर्व सार्वजनिक उपक्रम नियमितपणे सुरू झाल्याचे दावेही करण्यात आले होते.
मात्र राजधानी बीजिंगपासून सुमारे १८० मैलांवर असलेल्या शहरांमध्येच पुन्हा कोरानाचे रुग्ण आढळल्याने चिनी राजवटीचे दावे खोटे असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाव्हायरसच्या चौकशीसाठी आंतरराष्ट्रीय पथक चीनमध्ये दाखल होत असतानाच साथीचा वाढता फैलाव समोर येण्याची घटना चीनच्या राजवटीसाठी मोठा धक्का ठरतो. कोरोना साथीच्या नव्या फैलावाच्या पार्श्वभूमीवरच चीनच्या कंपनीने तयार केलेली लस सदोष असल्याचा दावा एका चिनी डॉक्टरकडून करण्यात आला आहे.
शांघाय शहरातील डॉक्टर ताओ लिना यांनी, चीनच्या ‘सिनोफार्म’ कंपनीने तयार केलेल्या लसीचे तब्बल ७३ ‘साईड इफेक्ट्स’ असल्याचा दावा केला आहे. चीनची ही लस जगातील सर्वाधिक असुरक्षित लस असल्याचेही डॉक्टर ताओ यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. सोशल मीडियावर टाकलेली ही पोस्ट काही काळाने गायब करण्यात आल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. चीनच्या कंपन्यांनी कोरोनावर चार लसी तयार केल्या असून आफ्रिका, लॅटिन अमेरिका, आखात तसेच आग्नेय आशियाई देशांमध्ये त्या पाठविण्यात आल्या आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांनी चिनी लसींवर चिंता व्यक्त केली असून, संबंधित कंपन्यांनी आवश्यक माहिती प्रसिद्ध केली नसल्याचा ठपका ठेवला आहे.