इस्लामाबाद – लेफ्टनंट जनरल असीम मुनीर पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख बनणार आहेत. राष्ट्रपती अरिफ अल्वी यांनी त्यांच्या नियुक्तीपत्रावर स्वाक्षरी केल्यानंतर लष्करप्रमुखपदावरून सुरू असलेला वाद संपुष्टात आल्याचे दावे केले जातात. मात्र त्याच्या आधी राष्ट्रपती अल्वी यांनी विरोधी पक्षनेते इम्रान खान यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. असीम मुनीर हे इम्रान खान यांचे विरोधक व लष्करप्रमुख जनरल बाजवा यांचे विश्वासपात्र अधिकारी मानले जातात. म्हणूनच त्यांच्या नियुक्तीवर इम्रान खान व त्यांचे सहकारी नाराज झाले आहेत. मुनीर यांच्या नियुक्तीची चर्चा सुरू झालेली असतानाच, इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या लष्करावर टीका सुरू केली. अमेरिकेने पुकारलेल्या दहशतवादविरोधी युद्धात पाकिस्तानच्या लष्कराने भाड्याने घेतलेल्या बंदुकीसारखे काम केले, असा ठपका इम्रान खान यांनी ठेवला आहे.
लेफ्टनंट जनरल असीम मुनीर यांनी ‘आयएसआय’चे प्रमुख म्हणून काम पाहिले होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी त्यावेळी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावर असलेल्या इम्रान खान यांच्या पत्नीकडून केल्या जाणाऱ्या गैरव्यवहारांवर प्रकाश टाकला होता. त्यामुळे ते इम्रान खान यांचे कट्टर विरोधक असल्याचे दावे केले जातात. म्हणूनच जनरल बाजवा यांनी मुनीर यांची लष्करप्रमुखपदावर वर्णी लावल्याचा दावा केला जातो. तसेच पाकिस्तानात सध्या सत्तेवर असलेल्या पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सरकारलाही इम्रान खान यांना धडा शिकवू शकणारा अधिकारी लष्करप्रमुखपदावर हवा होता. त्यामुळे लेफ्टनंट जनरल असीम मुनीर यांच्या नियुक्तीवर पाकिस्तानचे सरकार व लष्करप्रमुख जनरल बाजवा यांचे एकमत झाल्याची चर्चा आहे.
मात्र या नियुक्तीमुळे इम्रान खान आणि त्यांचे समर्थक अस्वस्थ झाले आहेत. पाकिस्तानचे सध्याचे राष्ट्रपती अरिफ अल्वी हे इम्रान खान यांच्या पक्षातून आलेले आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या मंत्रिमंडळाने लेफ्टनंट जनरल असीम मुनीर यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव अल्वी यांच्याकडे पाठविल्यानंतर त्यांनी इम्रान खान यांना भेटण्यासाठी लाहोरमध्ये धाव घेतली होती. खान यांच्याशी चर्चा करून अल्वी इस्लामाबादमध्ये परतले आणि त्यांनी मुनीर यांच्या नियुक्तीच्या प्रस्तावावर स्वाक्षऱ्या केल्या. इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ’ (पीटीआय) पक्षाचे नेते फवाद चौधरी यांनी लष्करप्रमुखपदावर असीम मुनीर कसे काम करतात, ते पाहून मगच त्यावर प्रतिक्रिया दिली जाईल, अशी सावध भूमिका घेतली आहे.
असीम मुनीर यांच्या नियुक्तीच्या बातम्या येत असतानाच, इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या लष्करावर नव्याने टीका केली आहे. अमेरिकेने पुकारलेल्या युद्धात पाकिस्तानच्या लष्कराने भाड्याने घेतलेल्या बंदुकीसारखे काम केले, अशी टीका इम्रान खान यांनी केली. आधी दिलेल्या एका मुलाखतीत इम्रान खान यांनी पाकिस्तान अमेरिकेचा गुलाम असल्याचे शेरे मारले होते. त्यावर खुलासा देताना इम्रान खान यांनी पाकिस्तानचे अमेरिकेबरोबरील संबंध भारत व अमेरिकेच्या संबंधांसारखे सन्मानजनक नाहीत, असा दाखला दिला. यानंतर त्यांनी अमेरिकेच्या दहशतवादविरोधी युद्धात पाकिस्तानच्या लष्कराने भाड्याने घेतलेल्या बंदुकीसारखे काम केल्याचा टोला लगावाला. इम्रान खान यांची ही टीका म्हणजे योगायोग नसून ते लष्करप्रमुखपदावर येत असलेल्या असीम मुनीर यांना इशारा देत असल्याचे दिसत आहे. पुढच्या काही महिन्यात पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा करा, अशी मागणी इम्रान खान करीत आहेत. याबरोबरच या निवडणुकीत पाकिस्तानच्या लष्कराने आपल्याला गुप्तपणे सहाय्य करून सत्तेवर आणावे, अशी इम्रान खान यांची अपेक्षा आहे. मात्र यापुढे पाकिस्तानचे लष्कर राजकीय हस्तक्षेप करणार नाही, अशी घोषणा करून सध्याचे लष्करप्रमुख जनरल बाजवा यांनी इम्रान खान करीत असलेली मागणी धुडकावून लावली आहे. असीम मुनीर यांच्याकडून देखील इम्रान खान यांना तितकेच किंबहुना अधिक कठोर उत्तर मिळण्याची दाट शक्यता समोर येत आहे.
यामुळे पाकिस्तानच्या सरकारसह लष्करावरही सडकून टीका करणारे इम्रान खान पुढच्या काळात अधिक आक्रमक होतील, असे दावे केले जातात.
हिंदी