युक्रेनच्या मुद्यावरील तणाव कमी करण्यासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन रशियाला भेट देणार

पॅरिस/मॉस्को – युक्रेन मुद्यावरून रशिया व पाश्‍चात्य देशांमध्ये सुरू असणार्‍या शाब्दिक चकमकींच्या पार्श्‍वभूमीवर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन पुढील आठवड्यात रशियाला भेट देणार आहेत. गेल्याच आठवड्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन व फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये फोनवरून चर्चा झाली होती. मॅक्रॉन हे रशियाला भेट देणारे पहिलेच मोठे युरोपिय नेते असल्याचे सांगण्यात येते. अमेरिका व ब्रिटनने नुकतेच रशियाने युक्रेनवरील आक्रमणासाठी बनावट हल्ल्यांचे कट आखल्याचे दावे समोर आणले होते. या पार्श्‍वभूमीवर मॅक्रॉन यांचा दौरा महत्त्वाचा मानला जातो.

युक्रेनच्या मुद्यावरील तणाव कमी करण्यासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन रशियाला भेट देणारयुक्रेन मुद्यावरील तणाव कमी करण्यासाठी पुतिन यांनी अमेरिका व नाटोला ‘सिक्युरिटी पॅक्ट’चा प्रस्ताव दिला होता. रशियाने दिलेल्या प्रस्तावात, नाटोने युक्रेन व जॉर्जियासह एकेकाळी ‘सोव्हिएत संघराज्या’चा भाग असणार्‍या कोणत्याही देशाला सदस्यत्व देऊ नये, अशी मागणी करण्यात आली होती. त्याचवेळी नाटोने पूर्व तसेच मध्य युरोपातील लष्करी तैनाती मागे घ्यावी व रशियन सीमेनजिकचे सराव थांबवावे, असेही म्हटले होते. मात्र अमेरिका तसेच नाटोने दिलेल्या लेखी उत्तरात या मागण्या फेटाळण्यात आल्या आहेत.

या नकारामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष नाराज असून युक्रेनवरील आक्रमणासाठी तैनाती अधिक वाढविण्यात येत असल्याचे वृत्त समोर आले होते. रशियाच्या या नव्या हालचालींच्या पार्श्‍वभूमीवर पाश्‍चात्य देशांनी पुन्हा एकदा चर्चेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. युक्रेनच्या मुद्यावरील तणाव कमी करण्यासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन रशियाला भेट देणारअमेरिकेने रशियाला एक स्वतंत्र प्रस्तावही दिला असून त्यात युरोपातील तळांची पाहणी करण्याच्या तरतुदीचा समावेश आहे. मात्र अमेरिकेच्या प्रस्तावावर नाटोतील युरोपिय सदस्य देशांमध्ये एकमत नसल्याचे सांगण्यात येते.

या पार्श्‍वभूमीवर फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा ठरतो. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी यापूर्वीही युरोप व रशियामधील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्‍वभूमीवर रशियन राष्ट्राध्यक्षांशी चर्चा करण्याची भूमिका घेतली होती. गेल्या काही महिन्यात दोन्ही नेत्यांमध्ये अनेकदा बोलणी झाल्याकडे विश्‍लेषकांनी लक्ष वेधले आहे.

दरम्यान, फ्रेंच राष्ट्राध्यक्षांपाठोपाठ जर्मनीचे नवे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ १५ फेब्रुवारीला रशियाचा दौरा करतील, अशी माहिती रशियन प्रवक्त्यांनी दिली आहे.

leave a reply