महाराष्ट्रात चोवीस तासात कोरोनाचे २७ रुग्ण दगावले

मुंबई,  (वृत्तसंस्था) – महाराष्ट्रातील कोरोनाव्हायरसच्या बळींची संख्या ३६९ वर पोहोचली असून सोमवारी दिवसभरात राज्यात कोरोनामुळे २७ जण दगावले. तसेच या एका दिवसात ५२२ नव्या रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या वाढून ८,५९० वर पोहोचली आहे. मुंबईतच १५ जणांचा मृत्यू झाला असून ३१५ नवे रुग्ण सापडले आहेत.

राज्यात कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असून ही साथ रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना सुरु आहेत. केंद्र सरकारच्या सूचनांनुसार आतापर्यंत एक लाख ७६ हजार विलिगकरण बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णालयांची तीन श्रेण्यांमध्ये विभागणी करण्यात आली असून गंभीर रुग्णांसाठी असलेल्या पहिल्या श्रेणीतील रुग्णालयांमध्ये ३२ हजार ८६१ बेड्स तयार आहेत. तसेच तीन हजार व्हेंटीलेटर्सही राज्यात उपलब्ध असल्याची माहिती, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 

राज्यात या साथीने दगाविणाऱ्यांची संख्या आणि रुग्णांची संख्या सतत वाढत असल्याने चिंता वाढल्या आहेत. विशेषतः मुंबई आणि पुण्यात रुग्ण वाढण्याचे प्रमाण सार्वधिक आहे. सोमवारी राज्यात या साथीमुळे २७ जण दगावले, तर ५२२ नवे रुग्ण आढळले. मुंबईतच आतापर्यंत २१९ जण दगावले असून एकूण रुग्णांची संख्या ५,५८९ वर पोहोचली आहे. पुण्यात आतापर्यंत १,१९३ रुग्ण सापडले आहेत, ८६ जणांचा या साथीत बळी गेला आहे.तसेच  राज्यात सध्या १ लाख ४५ हजार जण  क्वारंटाईन असून या साथीचे १,२७२ रुग्ण बरे झाले असल्याची  माहिती राज्य सरकारने दिली आहे. 

leave a reply