महाराष्ट्रात चोवीस तासात २७ हजार नवे रुग्ण आढळले

- नागपूरमधील ‘लॉकडाऊन’चा कालावधी वाढला / मुंबईत गर्दीच्या ठिकाणी ‘अँटीजन’ चाचण्या होणार

मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या भरमसाठ वेगाने वाढत आहे. याआधी सलग दोन दिवसात चोवीस तासात २५ हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळले होते, तर शनिवारी एका दिवसात आढळलेल्या कोरोनाच्या रुग्ण संख्येने २६ हजारांचाही टप्पा ओलांडला आहे. प्रचंड वेगाने पसरत असलेले कोरोनाचे संक्रमण पाहता राज्यात ‘लॉकडाऊन’ची शक्यता दिवसेंदिवस बळावत चालली आहे. नागपूरमध्ये गेल्या आठवड्यापासून ‘लॉकडाऊन’ आहे. मात्र तेथे हा ‘लॉकडाऊन’ कालावधी ३१ मार्चपर्यंत वाढविण्यात आला आहे. तसेच मुंबईत गर्दीच्या ठिकाणी सरसकट ‘अँटीजन’ चाचण्या घेण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.

शनिवारी राज्यात २७ हजार १२६ नव्या रुग्णांची नोंद झाली. तसेच ९२ जणांचा बळी गेला. एका दिवसात नोंद होत असलेल्या रुग्णांची संख्या आणि दरदिवशी जाणार्‍या बळींचा आकडा ९०च्या पुढे पोहोचल्याने चिंता अधिकच वाढल्या आहेत. सध्या राज्यात कोरोनाची १ लाख ९१ हजार अ‍ॅक्टीव्ह प्रकरणे आहेत. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील अ‍ॅक्टीव्ह केसेसची संख्या ३० हजारापर्यंत खाली आली होती. यावरून राज्यात किती वेगाने कोरोना संक्रमण होत असल्याचे स्पष्ट होते. राज्य सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात सध्या ९ लाख १८,४०८ जण होम क्वारंटाईन आहेत. तसेच केवळ ७ हजार ९५३ जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

शनिवारी मुंबईत २९८२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. ठाणे मंडळात ५ हजार ६१७ नवे रुग्ण आढळले आहेत. नाशिक मंडळात ४ हजार २८० नवे रुग्ण सापडले आहेत. पुणे मंडळात राज्यात सर्वाधिक ६ हजार ११७ नवे रुग्ण आढळले आहेत. यातील पुणे पालिका क्षेत्रात ३,२०० रुग्णांची नोंद झाली आहे. देशात सर्वाधिक वेगाने पुण्यातच कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात सध्या असलेल्या अ‍ॅक्टीव्ह केसेसपैकी १३ टक्के पुण्यातील आहेत. यावरुन पुणे जिल्ह्यातील परिस्थितीचा अंदाज येईल.

नागपूर मंडळात ४४३३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. नागपूर पालिका क्षेत्रात २८७३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. १५ मार्चपासून नागपूर शहरात ‘लॉकडाऊन’ आहे. मात्र तरीही नागपूरमध्ये रुग्णसंख्या कमी झालेली नाही. उलट त्यामध्ये वाट होत आहे. हे पाहता प्रशासनाने आधी घातलेले निर्बंध जिल्ह्यात तसेच कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नागपूर शहरातील ‘लॉकडाऊन’ कालावधी ३१ मार्चपर्यंत वाढविण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर नागपूरमध्ये प्रवासी मजूर पुन्हा आपल्या गावी परतू लागले आहेत. यामुळे बस स्थानकांवर गर्दी उसळली असून यामुळे कोरोनाचा फैलाव अधिक वेगाने होईल, अशी भीती व्यक्त केली जाते.

राज्यात ‘लॉकडाऊन’ लावणे हा शेवटचा पर्याय असल्याचे नुकतेच मुख्यमंत्री म्हणाले होते व जनतेला नियम पाळण्याचे आवाहन केले होते. मात्र ज्या वेगाने मुंबईसह राज्यात इतर ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे व नियम पालन होत नसल्याचे दिसत आहे ते पाहता राज्यात ‘लॉकडाऊन’ शक्यता बळावत चालल्याचे दावे करण्यात येतात.

leave a reply