मुंबई – महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांमध्ये आता घरातच क्वारंटाईन किवा आयसोलेशनवर बंदी घालण्यात आली आहे. कोरोना आणि म्युकरमायकोसिस या साथींसदर्भात एक आढावा बैठक राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना पॉझिटिव्ह दर जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये होम क्वारंटाईन बंद करण्यात येईल. तर पॉझिटिव्ह येणार्या सर्वांना कोविड केअर सेंटरमध्ये आयसोलेशन करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली.
राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत. दरदिवशी आढळत असलेल्या या साथीच्या नव्या रुग्णांची संख्या आता 25 हजारांपेक्षा कमी झाली आहे. मंगळवारी राज्यात 24 हजार 136 नव्या रुग्णांची नोंद झाली. पंधरादिवसांपूर्वी राज्यात चोवीस तासात 50 ते 60 हजार नव्या रुग्णांची नोंद केली जात होती. थोडक्यात महाराष्ट्रात दिवसाला नोंद होणार्या कोरोना रुग्णांच्या संख्येत निम्म्याने घट झाली आहे. मात्र राज्यातील काही जिल्ह्यात कोरोनाचा पॉझिटिव्ह दर जास्त असून असे जिल्हे रेड झोनमध्ये आहेत.
महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी 18 जिल्ह्यांचा पॉझिटिव्ह दर सरासरीपेक्षा जास्त असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडील माहितीवरून स्पष्ट होते. राज्यात रेड झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यात रत्नागिरी, सिंधुदूर्ग, रायगड, ठाणे, पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर, अहमदनगर, अमरावती, अकोला, वर्धा, बीड, उस्मानाबाद, लातूर, सांगली, गडचिरोली आणि हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.
होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांपासून त्यांचे कुटुंबियही संक्रमित होत आहेत. त्यामुळे आता होम क्वारंटाईन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे कोरोनाचे संक्रमण रेड झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यांमध्ये कमी करता येईल, असा तर्क यामागे आहे.
नव्या निर्णयानुसार आता या 18 जिल्ह्यांमध्ये प्रत्येक पॉझिटिव्ह रुग्णाला कोविड सेंटरमध्ये भरती व्हावे लागेल. यासाठी या जिल्ह्या प्रशासनाला कोविड केअर सेंटर वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. थोडक्यात या 18 जिल्ह्यातील सर्व अॅक्टिव्ह रुग्णांना कोविड सेंटरमध्येच आयसोलेट व्हावे लागणार आहे.
दरम्यान, गौण खनिजांच्या लिलावातून मिळत असलेला निधी हा गावांमध्ये कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी वापरण्याचे निर्देश जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली.