मालीने दहशतवादविरोधी संघर्षासाठी रशियाच्या कंत्राटी जवानांचे सहाय्य घेतले

- अमेरिकेचा मालीला इशारा

वॉशिंग्टन/पॅरिस – गेल्या काही वर्षांपासून मालीच्या सुरक्षेला आव्हान देणार्‍या दहशतवादी संघटनांविरोधी कारवाईसाठी मालीच्या लष्करी राजवटीने रशियाच्या कंत्राटी जवानांचे सहाय्य घेतले. आत्तापर्यंत या संघर्षात फ्रान्सचे लष्कर अपयशी ठरल्याचे सांगून मालीने रशियाच्या ‘वॅग्नर’ या कंपनीच्या कंत्राटी जवानांना तैनात केले आहे. अमेरिकेच्या आफ्रिकॉमचे प्रमुख जनरल स्टिफन टाऊनसेंड यांनी हा माहिती दिली. त्याचबरोबर रशियन कंत्राटी जवानांचे सहाय्य मालीच्या सुरक्षेसाठी चांगले ठरणार नाही, असा इशाराही जनरल टाऊनसेंड यांनी दिला.

पश्‍चिम आफ्रिकेतील माली या देशात गेल्या काही महिन्यांपासून लष्करी राजवट आहे. कर्नल असिमी गोईता यांनी मालीची सत्ता ताब्यात घेतली आहे. आफ्रिकेतील सोन्याचा तिसरा सर्वात मोठा उत्पादक देश म्हणून ओळखला जातो. पण मालीमधील सुरक्षा व सुव्यवस्था हा प्रश्‍न नेहमीच चिंतेचा ठरला आहे. अल कायदा आणि आयएसशी संलग्न दहशतवादी संघटना तसेच काही सशस्त्र टोळ्या मालीच्या सुरक्षेला आव्हान देत आहेत. या दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यासाठी मालीने फ्रान्सच्या लष्कराचे सहाय्य घेतले होते.

अमेरिकेच्या आफ्रिका कमांड अर्थात आफ्रिकॉमचे प्रमुख जनरल स्टिफन टाऊनसेंड यांनी ‘हाऊस आर्म्ड् सर्व्हिसेस कमिटी’समोरच्या सुनावणीत याची माहिती दिली. फ्रान्सचे ४,३०० जवान मालीमधील दहशतवादविरोधी कारवाईत सहभागी झाले होते. पण मालीच्या लष्करी राजवटीचे प्रमुख कर्नल गोईता फ्रेंच लष्कराच्या कारवाईवर समाधानी नसल्याचे जनरल टाऊनसेंड यांनी सांगितले.

फ्रान्सचे लष्कर मालीमधील दहशतवादविरोधी संघर्षात अपयशी ठरल्याची टीका गोईता यांची राजवट करीत आहे. त्यामुळे मालीच्या लष्करी राजवटीने दहशतवादविरोधी कारवाईसाठी वॅग्नर या रशियन कंपनीच्या कंत्राटी जवानांना आपल्या देशात तैनात केल्याचे टाऊनसेंड म्हणाले. वॅग्नरचे सुमारे हजार जवान सध्या मालीमध्ये तैनात अल्याची माहिती जनरल टाऊनसेंड यांनी दिली.

वॅग्नरच्या धोक्याबाबत कर्नल गोईता यांना कल्पना दिली आहे. सिरिया व इतर देशांमधील मोहिमांमध्ये वॅग्नरच्या जवानांनी अतिशय निष्ठूरपणे कारवाई केल्याचा इशारा मालीच्या लष्करी राजवटीला दिल्याचे टाऊनसेंड म्हणाले. पण मालीच्या राजवटीने अमेरिकेच्या सुचनेकडे दुर्लक्ष करून वॅग्नरच्या तैनातीला महत्त्व दिल्याची माहिती जनरल टाऊनसेंड यांनी अमेरिकन सिनेटसमोर दिली.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेचा आफ्रिकेतील प्रभाव ओसरत चालल्याचा दावा केला जातो. मालीप्रमाणे सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक या देशानेही अमेरिकेचा सल्ला नाकारून रशियन वॅग्नरशी सहकार्य प्रस्थापित केले आहे. अमेरिकेतील लष्करी विश्‍लेषक याकडे लक्ष वेधत आहेत.

leave a reply