जेरूसलेम – ‘‘26/11चा हल्ला म्हणजे केवळ भारतावरचाच नाही, तर इस्रायलवर झालेला दहशतवादी हल्ला होता. या हल्ल्यासाठी ‘लश्कर-ए-तोयबा’च्या दहशतवाद्यांना ज्या सूत्रधारांनी पाठविले होते, त्यांना याची जबर किंमत मोजण्यास भाग पाडायलाच हवे. दहशतवाद हा भारत व इस्रायलचा समान शत्रू आहे’’, असे इस्रायलची संसदेचे सभापती अमिर ओहाना यांनी म्हटले आहे. भारताच्या दौऱ्यावर येण्याआधी मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याची आठवण करून देऊन ओहाना यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शुक्रवारपासून ओहाना यांची चार दिवसांची भारतभेट सुरू होत आहे.
2008 साली मुंबईत घडविण्यात आलेल्या 26/11च्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 207 जणांचा बळी गेला होता. यातील 178 भारतीय होते. मुंबईतील ज्यूधर्मियांच्या छाबड हाऊसला देखील दहशतवाद्यांनी लक्ष्य केले आणि त्यांचा बळी घेतला होता, याची आठवण अमिर ओहाना यांनी करून दिली. हा केवळ भारत किंवा इस्रायलवरचा हल्ला नव्हता, तर हा उदार विचारसरणीवर विश्वास असलेल्या प्रत्येकावर झालेला हल्ला होता. भारत आणि इस्रायलच्या एकसमान विचारसणीला या दहशतवादी हल्ल्याद्वारे लक्ष्य करण्यात आले होते, असे ओहाना पुढे म्हणाले. म्हणूनच मुंबईतील छाबड हाऊसवरील हा हल्ला म्हणजे भारत व इस्रायलला झालेल्या यातनांचे प्रतिक ठरत आहे, अशी प्रतिक्रिया ओहाना यांनी दिली.
‘भारत व इस्रायल यांचा समान मुल्यांवर विश्वास आहे आणि दोन्ही देश ऐतिहासिकदृष्ट्या एकमेकांशी जोडलेले आहेत. भारत हा ज्यूधर्मियांच्या द्वेषाला थारा न देणारा देश असून ही बाब अतिशय अनोखी ठरते. म्हणूनच इस्रायलच्या संसदेचा सभापती या नात्याने आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी मी भारताची निवड केली’, असे ओहाना यांनी स्पष्ट केले. आपल्या या दौऱ्यात अमिर ओहाना भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपपरराष्ट्रमंत्री जगदीप धनखड, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर व लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत.
मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्यासाठी ‘लश्कर’च्या दहशतवाद्यांना धाडणाऱ्या सूत्रधारांना याची जबर किंमत मोजण्यास भाग पाडायलाच हवी, अशा जहाल शब्दात इस्रायली संसदेच्या सभापतींनी थेट नामोल्लेख टाळून पाकिस्तानलाच लक्ष्य केल्याचे दिसत आहे. भारताने सबळ पुरावे देऊनही पाकिस्तानने 26/11चा सूत्रधार असलेल्या हफीज सईद व त्याच्या साथीदारांवर कारवाई केलेली नाही. मात्र यावरून आंतरराष्ट्रीय दडपण आले की पाकिस्तान दुसऱ्याच एखाद्या प्रकरणात हफीज सईदला गुन्हेगार ठरवून तुरुंगवासाची शिक्षा सुनावते. पण हफीज सईद, लखीउर रेहमान लख्वी तसेच मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याशी संबंधित असलेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानच्या न्यायालयाने सुनावलेली तुरुंगवासाची शिक्षा म्हणजे धूळफेक असल्याचा आरोप भारताने केला होता.
या सर्वांना तुरुंगात डांबल्यासारखे दाखवून पाकिस्तानच्या यंत्रणा दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांना संरक्षण पुरवित असल्याचे उघड झाले होते. तुरुंगवासात असताना या दहशतवाद्यांना कुणालाही व कितीही वेळा भेटण्याची परवानगी असते. त्यामुळे तुरुंगातूनच ते आपल्या हस्तकांमार्फत दहशतवादी कारवाया करू शकतात, हे वारंवार उघड झाले होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताने ही बाब वारंवार मांडली होती.
या पार्श्वभूमीवर, इस्रायली संसदेचे सभापती अमिर ओहाना यांनी केलेली मागणी लक्ष वेधून घेणारी ठरते आहे. 26/11च्या दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांना याची जबर किंमत मोजण्यास भाग पाडणे, याचाच अर्थ थेट पाकिस्तानलाच धडा शिकविणे असा होतो. कारण पाकिस्तान आजवर अशा दहशतवादी संघटनांचे संरक्षण व भरणपोषण करीत आलेला आहे.
मात्र अलीकडच्या काळात या दहशतवादी संघटनांच्या नेत्यांचे संरक्षण करणे पाकिस्तानसाठी अवघड बनत चालल्याचे दिसू लागले आहे. दहशतवादी संघटनांचे म्होरके व त्यांना सर्वतोपरी सहाय्य करणाऱ्या आयएसआयच्या अधिकाऱ्यांवर हल्ले सुरू झाले असून यात ते ठार झाल्याच्याही बातम्या पाकिस्तानातून येत आहेत.