हिंदी महासागर क्षेत्रातील देशांच्या बैठकीला सुरुवात

पणजी – हिंदी महासागर क्षेत्रातील चीनच्या वाढत्या हालचालींच्या पार्श्‍वभूमीवर या क्षेत्रातील देशांच्या नौदलांचा समावेश असलेली परिषद गोव्यात आयोजित करण्यात आली आहे. भारतीय नौदलाने आयोजित केलेली ही परिषद तीन दिवस चालणार असून त्यासाठी १२ देशांच्या नौदलाचे प्रमुख दाखल झाले आहेत. या देशांमध्ये भारतासह सिंगापूर, इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, मॉरिशस, मालदीव, मादागास्कर, कोमोरोस व सेशल्सचा समावेश आहे.

हिंदी महासागर क्षेत्रातील देशांच्या बैठकीला सुरुवात‘गोवा मेरिटाईम कॉन्क्लेव्ह-२०२१’ असे या परिषदेचे नाव असून हिंदी महासागर क्षेत्रातील धोक्यांच्या मुद्यावर चर्चा होईल, अशी माहिती नौदलाच्या प्रवक्त्यांनी दिली. गोव्यातील ‘नेव्हल वॉर कॉलेज’मध्ये होणार्‍या या परिषदेस भारताच्या नौदलप्रमुखांव्यतिरिक्त संरक्षण तसेच परराष्ट्र विभागाचे सचिवही उपस्थित राहणार आहेत. भारतीय नौदलाने चीनच्या वाढत्या धोक्यांविरोधात सहकारी देशांना एकत्र घेऊन आघाडी उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. नौदलप्रमुखांची परिषद त्याचाच भाग मानला जातो.

leave a reply