तेहरान – इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या जवानांनी थेट पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर कारवाई केली आहे. या कारवाईत इराणने दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या आपल्या जवानांची यशस्वी सुटका केली. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने ही माहिती उघड केली. इराणची ही कारवाई म्हणजे पाकिस्तानवरील आणखी एक सर्जिकल स्ट्राईक असल्याचा दावा विश्लेषक करीत आहेत.
‘रिव्होल्युशनरी गार्ड्स – आयआरजीसी’ने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी इराणच्या जवानांनी पाकिस्तानच्या बलोचिस्तानात घुसून ‘जैश उल-अदल’च्या तळावर हल्ला चढविला. या हल्ल्यात सदर संघटनेचे दहशतवादी मोठ्या संख्येने ठार झाल्याचे आयआरजीसीने म्हटले आहे. आपली ही कारवाई यशस्वी ठरली असून पाकिस्तानी दहशतवादी संघटनेच्या अटकेत असलेल्या आपल्या दोन्ही जवानांची सुटका केल्याचे आयआरजीसीने स्पष्ट केले. या कारवाईत पाकिस्तानी जवानही ठार झाल्याचा दावा माध्यमे करीत आहेत. २०१८ साली पाकिस्तानातील जैश उल-अदलच्या दहशतवाद्यांनी इराणच्या सिस्तान-बलोचिस्तान प्रांतात?घुसून १२ इराणी जवानांचे अपहरण केले होते. पाकिस्तानी लष्कराच्या सहाय्याशिवाय दहशतवादी आपल्या सीमेवर हल्ला चढवू शकत नाही, असा आरोप इराणने तेव्हा केला होता. त्यानंतर इराणने १५ नोव्हेंबर २०१८ आणि २१ मार्च २०१९ असे दोन वेळा पाकिस्तानात घुसून नऊ जवानांची सुटका केली होती. त्यामुळे सलग तीन वर्षे इराणने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांवर कारवाई केली आहे.
याआधी भारतानेही पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर सर्जिकल स्ट्राईक केले आहेत. २०१६ साली जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी उरी येथील भारतीय लष्कराच्या तळावर चढविलेल्या हल्ल्यात भारताचे १९ सैनिक शहिद झाले होते. त्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. तर २०१९ साली जैशच्या दहशतवाद्यांनी पुलावामा येथील भारताच्या ‘सीआरपीएफ’च्या वाहनावर केलेल्या हल्ल्यात ४६ सैनिक शहिद झाले होते. यानंतर खवळलेल्या भारताने थेट पाकिस्तानच्या खैबर-पख्तूनवाला येथील बालाकोटमध्ये विमाने रवाना करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. भारताच्या या कारवाईत मोठ्या संख्येने जैशचे दहशतवादी ठार झाले होते.
दरम्यान, इराणच्या सिस्तान-बलोचिस्तान प्रांतात सैन्य घुसविण्याची घोषणा पाकिस्तानी लष्कराच्या मेजर जनरल हुद्यावरील अधिकार्याने नुकतीच एका सभेत केली होती. यासाठी चीनने आपल्याला मोठ्या प्रमाणात पैसे पुरविल्याची जाहीर कबुली पाकिस्तानच्या या लष्करी अधिकार्याने दिली होती.