मॉस्को/किव्ह – युक्रेनमधील युद्धात रशियाची संरक्षणक्षमता क्षीण होत चालल्याचे दावे पाश्चिमात्य यंत्रणा व माध्यमांकडून करण्यात येत होते. या दाव्यांना रशियाने मंगळवारी सणसणीत प्रत्युत्तर दिले. रशियन संरक्षणदलांनी युक्रेनची राजधानी किव्हसह देशातील अनेक महत्त्वाच्या शहरांवर क्षेपणास्त्रांसह ड्रोन्सचा वर्षाव केला. यासाठी जवळपास १०० क्रूझ क्षेपणास्त्रे व आत्मघाती ड्रोन्सचा वापर करण्यात आला. रशियाने युक्रेनमधील लष्करी मोहिम सुरू केल्यानंतरचा हा सर्वात मोठा क्षेपणास्त्रहल्ला असल्याचे सांगण्यात येते.
फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस युक्रेनविरोधात लष्करी मोहीम सुरू करताना रशियाने क्षेपणास्त्र, तोफा, रणगाडे व रॉकेट्सच्या सहाय्याने मोठे हल्ले चढविले होते. त्यानंतर रशियाने युक्रेनचे लष्करी तळ व मोजक्या भागांचा अपवाद वगळता क्षेपणास्त्रांचा मोठ्या प्रमाणात वापर केला नव्हता. पण गेल्या महिन्यात क्रिमिआतील ब्रिजवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर रशियाने आपल्या धोरणात बदल केले. क्रिमिआतील हल्ल्यांचा सूड उगविताना रशियाने युक्रेनमधील विविध शहरांवर तब्बल ८० क्षेपणास्त्रांचा मारा केला होता.
या हल्ल्यानंतर रशियाने युक्रेनमधील शहरांवर नियमित क्षेपणास्त्र तसेच ड्रोनहल्ल्यांचे सत्र सुरू केले. मात्र मंगळवारी करण्यात आलेला मारा आतापर्यंतचा सर्वात मोठा क्षेपणास्त्रहल्ला ठरला आहे. मंगळवारी केलेल्या घणाघाती हल्ल्यात रशियाने ८०हून अधिक क्रूझ मिसाईल्स तसेच गायडेड मिसाईल्सचा वापर केल्याचे समोर आले. याव्यतिरिक्त १०हून अधिक आत्मघाती ड्रोन्सही डागण्यात आल्याचे सांगण्यात येते. या हल्ल्यांमध्ये रशियाची राजधानी किव्हसह पश्चिम युक्रेनमधील लिव्ह, डिनिप्रोपेट्रोव्हस्क, ओडेसा, झायटोमिर, किरोवोहराड, पोल्तावा, विनित्सिआ, व्होलिन व खार्किव्ह या शहरांना लक्ष्य करण्यात आले.
मंगळवारच्या हल्ल्यात वीजकेंद्रांसह संवेदनशील यंत्रणा तसेच लष्करी जागांवर मारा करण्यात आला. रशियाच्या नव्या घणाघाती हल्ल्यानंतर राजधानी किव्हसह काही शहरांमधील स्थिती अत्यंत गंभीर बनल्याची माहिती युक्रेनी अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, रशियाचे हल्ले सुरू असतानाच अमेरिकी गुप्तचर यंत्रणा सीआयएचे प्रमुख विल्यम बर्न्स यांनी युक्रेनची राजधानी किव्हला भेट दिल्याचे वृत्त समोर आले आहे.