प्योनग्यँग/वॉशिंग्टन – रविवारी सकाळी केलेली चाचणी ‘ह्वासॉंग-१२’ या दीर्घ पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची होती व या क्षेपणास्त्रात आण्विक हल्ल्याची क्षमता असल्याचे उत्तर कोरियाने जाहीर केले आहे. रविवारी केलेल्या चाचणीदरम्यान या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राने अंतराळातून काढलेले फोटोग्राफ्सही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. ‘ह्वासॉंग-१२’ या दीर्घ पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करण्याची २०१७ सालानंतरची ही पहिलीच वेळ होती. नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात उत्तर कोरियाने सात क्षेपणास्त्र चाचण्या करून अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधून घेतले आहे.
उत्तर कोरियाने रविवारी सकाळी क्षेपणास्त्र चाचणी घेतल्याची माहिती जपान व दक्षिण कोरियाने दिली होती. मात्र त्यासंदर्भात उत्तर कोरियाकडून कोणताही खुलासा करण्यात आला नव्हता. सोमवारी उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने चाचणीचे अधिकृत वृत्त प्रसिद्ध केले.
‘केसीएनए’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी सकाळी ‘ह्वासॉंग-१२’ या दीर्घ पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. क्षेपणास्त्राची ‘ऍक्युरसी’ तपासण्यासाठी चाचणी घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. चाचणीचे वृत्त देतानाच काही फोटोग्राफ्सही प्रसिद्ध करण्यात आले असून त्यातील दोन फोटोग्राफ्स अंतराळातून काढण्यात आलेले फोटो असल्याचे स्पष्ट करण्यात आले. क्षेपणास्त्रावर बसविलेल्या कॅमेर्यातून हे फोटोग्राफ्स काढल्याचा दावा करण्यात आला आहे. या क्षेपणास्त्राने जवळपास दोन हजार किलोमीटरची उंची गाठल्याचा दावाही करण्यात आला आहे.
रविवारी चाचणी केलेल्या क्षेपणास्त्रात ‘न्यूक्लिअर वॉरहेड’ नेण्याची क्षमता असल्याचेही म्हटले आहे. त्याचवेळी ‘ह्वासॉंग-१२’मध्ये पॅसिफिक महासागरातील अमेरिकी संरक्षणतळ असणार्या गुआमला लक्ष्य करण्याची क्षमता असल्याचेही उत्तर कोरियाच्या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. उत्तर कोरियाकडून एकामागोमाग होणार्या या चाचण्या अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाला आव्हान देणार्या असल्याचा दावा विश्लेषकांकडून करण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी उत्तर कोरियाकडून करण्यात येणार्या चाचण्या आंतरराष्ट्रीय समुदायासाठी धोका असल्याचा इशाराही दिला होता.