ब्रिक्समध्ये बाराहून अधिक नव्या देशांचा समावेश होऊ शकतो

रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह

BRICSमॉस्को – रशियासह भारत,चीन, ब्राझिल व दक्षिण आफ्रिका या देशांचे संघटन असलेल्या ‘ब्रिक्स’कडून विस्तारासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी, ‘ब्रिक्स’मध्ये जवळपास १२ हून अधिक नवे देश सामील होण्याची शक्यता वर्तविली आहे. यात अल्जिरिआ, अर्जेंटिना व इराणसारख्या देशांचा समावेश असल्याचे रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले. रशियन परराष्ट्रमंत्र्यांच्या या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर, आफ्रिकेतील अल्जिरिआ या देशाने ‘ब्रिक्स’च्या सदस्यत्वासाठी अर्ज सादर केल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे.

रशिया व चीन आणि भारताच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या ‘ब्रिक्स’चे महत्त्व वाढत असल्याचे गेल्या काही वर्षात समोर येत आहे. अमेरिका व युरोपिय देशांनी स्थापन केलेल्या ‘जी७’सारख्या गटाला ‘ब्रिक्स’ आव्हान देत असल्याचे दावे करण्यात येत आहेत. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाश्चिमात्यांच्या निर्बंधांचा मुकाबला करण्यासाठी रशिया विविध स्तरांवर प्रयत्न करीत आहे. ‘ब्रिक्स’च्या विस्तारासाठी सुरू असलेले प्रयत्नही त्याचाच भाग मानला जातो.

Algeiriaजुलै महिन्यात झालेल्या ‘ब्रिक्स’च्या बैठकीनंतर रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने अर्जेंटिना व इराणचा उल्लेख करून हे देश ‘ब्रिक्स’मध्ये सामील होण्यास तयार असल्याची माहिती दिली होती. रशियन नेत्यांनी ‘ब्रिक्स’ संघटन ‘जी७’ला पर्याय ठरु शकते, याकडे लक्ष वेधले होते. त्याचवेळी ब्रिक्समध्ये पाश्चिमात्य देशांचा समावेश करण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलेले वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरते.

‘आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक देश ब्रिक्समध्ये सामील होण्याबाबत उत्सुकता दाखवित आहेत. सध्या १२ हून अधिक नवे देश ब्रिक्समध्ये सामील होण्याच्या तयारीत आहेत’, असे परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह म्हणाले. अनेक देशांनी यासाठी अधिकृत पातळीवर अर्जही दिले आहेत, असा दावाही त्यांनी केला. रशियन माध्यमे व सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्जिरियासह इराण व अर्जेंटिनाने ब्रिक्ससाठी अर्ज दिले आहेत. तर सौदी अरेबिया, तुर्की, इजिप्त व अफगाणिस्तान यासारख्या देशांचाही ‘ब्रिक्स’मध्ये समावेश होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सध्या ब्रिक्समध्ये रशिया, भारत, चीन, ब्राझिल व दक्षिण आफ्रिकेचा समावेश असून हे देश जगातील ४० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येचे प्रतिनिधित्त्व करतात. जागतिक अर्थव्यवस्थेतील जवळपास २५ टक्के हिस्सा या अर्थव्यवस्थांकडे आहे.

leave a reply