लंडन – ब्रिटीश सरकारने कायद्यात केलेले कठोर बदल व संबंधित यंत्रणांनी सुरू केलेली कारवाई या पार्श्वभूमीवर ब्रिटनमधील 50हून अधिक चिनी विद्यार्थ्यांनी देशातून पलायन केल्याची माहिती गुप्तचर यंत्रणा ‘एमआय5’च्या प्रमुखांनी दिली. दोन दिवसांपूर्वीच ‘एमआय5′ व अमेरिकेची तपासयंत्रणा ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ने (एफबीआय) चीनच्या वाढत्या धोक्याकडे लक्ष वेधणारी संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. यात चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीकडून जगभरात सुरू असलेल्या छुप्या कारवायांची जाणीव करून देण्यात आली होती.
काही दशकांपूर्वी चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने ‘थाऊंजड टॅलेन्टस् प्लॅन’ नावाची एक योजना आखली होती. चिनी विद्यार्थ्यांनी विविध देशांमध्ये जाऊन उच्च शिक्षण घ्यावे यासाठी प्रोत्साहन देणारी योजना असे याचे ढोबळ स्वरुप होते. मात्र प्रत्यक्षात ही योजना म्हणजे शिक्षण, संशोधन व कौशल्याच्या नावाखाली गुप्तहेरांची भरती असल्याचे नंतरच्या काळात समोर आले. अमेरिकेसह युरोपमध्ये अशी अनेक प्रकरणे उघडकीस आली असून काही प्रकरणे न्यायालयातही गेली आहेत.
चिनी विद्यार्थी शिक्षण घेत असताना संरक्षण, दूरसंचार, ऊर्जा, रोबोटिक्स, विज्ञान यासारख्या क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान व संवेदनशील माहिती चोरत असल्याचे उघड झाले होते. याविरोधात अमेरिकेसह अनेक देशांनी आक्रमक उपाययोजना सुरू केल्या असून त्यात व्हिसाबंदीपासून ते विद्यार्थ्यांची संपूर्ण पार्श्वभूमी व चीनमधील सरकारी विभागांशी असलेले संबंध जाहीर करणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. ब्रिटनने ‘ॲकेडमिक टेक्नॉलॉजी ॲप्रव्हल स्किम’सारख्या परदेशी विद्यार्थ्यांच्या योजनेत कठोर तरतुदींचा समावेश केला होता. ब्रिटनमधील विद्यापीठांवर परदेशातील संस्था अथवा व्यक्तीकडून स्वीकारलेली देणगी जाहीर करण्याचेही बंधन टाकण्यात आले आहे.
त्याचवेळी ब्रिटीश गुप्तचर तसेच सुरक्षायंत्रणांनीही संशयित चिनी हेरांविरोधातील कारवाईची व्याप्ती अधिक तीव्र केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हेरगिरीचे काम करणाऱ्या ब्रिटनमधील चिनी विद्यार्थ्यांनी चीनमध्ये पळ काढण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत 50हून अधिक चिनी विद्यार्थ्यांनी अशा रितीने पलायन केल्याचे ‘एमआय5’चे संचालक केन मॅक्कलम यांनी सांगितले. या विद्यार्थ्यांचे चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’शी संबंध होते, असा संशय ब्रिटीश यंत्रणांना आहे, असेही मॅक्कलम यांनी पुढे नमूद केले.