अंकारा/दमास्कस/मॉस्को – ज्यो बायडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची सूत्रे हाती घेतल्यापासून, सिरियातील दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. नागरी वस्त्यांवर हल्ले चढवून दहशतवादी या देशाची शांती व स्थैर्य धोक्यात टाकत असल्याचा घणाघाती आरोप तुर्कीच्या आघाडीच्या वर्तमानपत्राने केला. गेल्या चोवीस तासात दहशतवाद्यांनी सिरियात 35 हल्ले चढविल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, ‘आयएस’ दहशतवाद्यांच्या कुटुंबियांसाठी उभारलेले शिबिर दहशतवाद्यांची नवी पिढी तयार करणारे ठरेल, असा इशारा सिरियन विश्लेषकाने दिला.
काही तासांपूर्वी सिरियाच्या उत्तरेकडील आफ्रिन भागात दहशतवाद्यांनी चढविलेल्या रॉकेट हल्ल्यात 10 जण जखमी झाले आहेत. यामध्ये सहा मुलांचा समावेश असल्याचा दावा केला जातो. आफ्रिनमधील या रॉकेट हल्ल्यासाठी ‘पीकेके’ समर्थक ‘वायपीजी’चे दहशतवादी जबाबदार असल्याचा आरोप तुर्की करीत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून ‘पीकेके’ व सिरियातील ‘वायपीजी’ या दहशतवादी संघटनांचे सिरियातील हल्ले वाढल्याचा आरोप तुर्कीच्या आघाडीच्या वर्तमानपत्राने केला.
तुर्कीच्या नियंत्रणात असलेल्या सिरियाच्या अल-बाब, आफ्रिन आणि एझाझ या शहरांवर पीकेकेकडून हल्ले चढविले जात आहेत. अमेरिकेतील बायडेन यांच्या नव्या प्रशासनाची दहशतवादविरोधातील भूमिका सुस्पष्ट नाही. यामुळे बायडेन सत्तेत आल्यापासून पीकेकेच्या दहशतवाद्यांनी सिरिया अस्थिर करण्याचा वेग वाढविल्याचा दावा सदर वर्तमानपत्राने केला. बायडेन यांच्या प्रशासनातील ‘ब्रेट मॅक्गर्क’ यांची नियुक्ती देखील अमेरिका व पीकेकेच्या दहशतवाद्यांमधील सहकार्याचे संकेत देणारी असल्याचा आरोप तुर्कीच्या वर्तमानपत्राने केला. चार दिवसांपूर्वीच तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी बायडेन प्रशासन कुर्द दहशतवाद्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप केला होता.
पीकेके अर्थात ‘कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी’ या कुर्दांच्या संघटनेला तुर्कीने दहशतवादी घोषित केले आहे. त्याचबरोबर पीकेकेशी संलग्न असलेली ‘वायपीजी’ ही सिरियातील संघटना देखील दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याचा आरोप तुर्की करीत आहे. गेल्या आठवड्यात इराकमध्ये 13 जणांच्या हत्येसाठी देखील ‘पीकेके’ जबाबदार असल्याचा ठपका तुर्कीने ठेवला होता. या दहशतवादी संघटनेने तुर्कीच्या नागरिकांना लक्ष्य केल्याचा दावा तुर्की करीत आहे. पण यामध्ये पोलीस व लष्करी जवान तसेच गुप्तहेर असल्याची माहिती समोर आली होती.
तुर्की व्यतिरिक्त रशियाने देखील गेल्या काही दिवसांपासून सिरियातील दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याचे म्हटले आहे. ‘जबात अल-नुस्र’ या अल कायदा संलग्न दहशतवादी संघटनेचे सिरियातील हल्ले वाढले आहेत. या संघटनेने एकट्या इदलिबमध्ये 18 ठिकाणी तर लताकियामध्ये 12, हमा आणि अलेप्पो येथे प्रत्येकी दोन रॉकेट हल्ले केले. या हल्ल्यात झालेल्या जीवितहानीचे तपशील समोर येऊ शकलेले नाहीत. पण गेल्या कित्येक महिन्यांपासून सिरियात लागू असलेल्या संघर्षबंदीचे ‘जबात’च्या दहशतवाद्यांनी उल्लंघन केल्याचा आरोप रशियन संरक्षण मंत्रालयाने केला आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, सिरियाच्या अल-हाऊल भागात ‘आयएस’ दहशतवाद्यांच्या कुटुंबियांसाठी उभारलेल्या शिबिरात गेल्या महिन्याभरात 20 जणांची हत्या करण्यात आली आहे. यामध्ये शिबिराच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस व लष्करी जवानांचा समावेश आहे. तर इराकी नागरिकाचे शिरकाण केल्याची घटनाही घडली आहे. वेळीच या घटनेची दखल घेऊन कारवाई केली नाही तर सदर शिबिरच ‘आयएस’च्या नव्या दहशतवाद्यांची नवी पिढी तयार करील असा इशारा अब्दुल्ला सुलेमान अली या सिरियन विश्लेषकाने दिला.