निकोसिआ – भूमध्य सागरी क्षेत्रातील तुर्कीच्या विस्तारवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर ग्रीस व सायप्रस या देशांनी तुर्कीविरोधी आघाडी उभारण्याच्या हालचालींना वेग दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून भूमध्य सागरी क्षेत्रात ‘नेमेसिस २०२१’ या बहुराष्ट्रीय सरावाचे आयोजन करण्यात आले होते. या सरावात अमेरिका, इस्रायल, ग्रीस, फ्रान्स, ब्रिटन, इजिप्त, इटली व सायप्रस सहभागी झाले होते. या देशांव्यतिरिक्त आघाडीच्या इंधनकंपन्यांचाही सरावात समावेश होता, अशी माहिती सायप्रसने दिली आहे.
गेल्या आठवड्यात सायप्रसच्या सागरी क्षेत्रात ‘नेमेसिस २०२१’ पार पडला. सरावात आठ देशांची ‘एरोनॉटिकल युनिट्स’ व जवान सहभागी झाले होते. त्याव्यतिरिक्त विविध देशांच्या युद्धनौका, ऑईल टँकर्स, हेलिकॉप्टर्स, ड्रोन्स, टेहळणी विमाने यांच्यासह ‘स्पेशल ऑपरेशन्स टीम्स’ही सरावात सामील होते, अशी माहिती सायप्रसने दिली.
सागरी क्षेत्रातील संघर्ष, इंधनप्रकल्पांवर होणारे दहशतवादी हल्ले, संशयास्पद वावर असणार्या बोटींविरोधात कारवाई, बचाव मोहीम यासारख्या गोष्टींचा सरावात सहभाग होता. सरावासाठी ‘एक्झॉनमोबिल’, ‘टोटल’, ‘एनि’ व ‘नोबल’ या इंधनकंपन्यांची पथकेही उपस्थित होती. या चारही इंधनकंपन्या भूमध्य सागरी क्षेत्रातील इंधनप्रकल्पांमध्ये सहभागी असल्याने त्यांचा समावेश महत्त्वाचा मानला जातो. सायप्रसच्या क्षेत्रात आयोजित करण्यात आलेला हा सागरी सराव भूमध्य सागरात तुर्कीकडून सुरू असलेल्या आक्रमक हालचालींना प्रत्युत्तर असल्याचे सांगण्यात येते. काही दिवसांपूर्वीच सायप्रसच्या परराष्ट्रमंत्र्यांनी, तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांना आखातापासून ते पूर्व भूमध्य क्षेत्रापर्यंत नवे ऑटोमन साम्राज्य उभे करायचे आहे, असा इशारा दिला होता.
गेल्या वर्षी तुर्कीने ग्रीसच्या तसेच सायप्रसच्या हद्दीतील बेटांवर आपला हक्क असल्याचा दावा करून इंधनक्षेत्रात संशोधन करण्यासाठी जहाजे व युद्धनौका पाठविल्या होत्या. त्यानंतर, तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप एर्दोगन यांनी, २० जुलै रोजी ‘सायप्रस’मधील तुर्कीश भागाला भेट दिली होती. या भेटीत सायप्रसमधील वादग्रस्त भाग असलेल्या ‘घोस्ट टाउन वरोशा’ पुन्हा सुरू करण्याचे संकेत दिले होते. तुर्की यंत्रणांनी त्यासाठी हालचालीही सुरू केल्याचे सांगण्यात येते.
या पार्श्वभूमीवर, सायप्रसने आंतरराष्ट्रीय समुदायाच्या माध्यमातून तुर्कीवर दडपण आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. नवा बहुराष्ट्रीय सराव त्याचाच भाग ठरतो.