मुंबई शेअर बाजार ४४ हजार अंशाच्या विक्रमी पातळीवर

- आठ महिन्यात ७० टक्क्यांची वाढ

मुंबई – मुंबई सेन्सेक्स ४४ हजार अंकांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. तसेच निफ्टी निर्देशांकानेही १२,८९३ अशांवर झेप घेतली आहे. कोरोनाच्या संकटानंतर भारतात मागणीत पुन्हा तेजी दिसून येऊ लागली आहे. तसेच गुंतवणूकदार भारताला पसंती देत असून गेल्या काही दिवसात परकीय गुंतवणूकदारांनीही भारतीय शेअर बाजाराला पसंती दिल्याचे दिसत आहे. यामुळे निर्देशांक सतत विक्रमी परतली गाठत असून पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत मुंबई निर्देशांकाने ५० हजाराची, तर निफ्टीने १४ हजारांची विक्रमी पातळी ओलांडलेली असेल, असे दावे विश्लेषक करीत आहेत.

शेअर बाजार

कोरोनाचे संकट सुरू असतानाही भारतीय शेअर बाजारात सतत तेजी दिसून येत आहे. मार्चमध्ये कोरोनाचे संकट सुरू होवून लॉकडाऊनची घोषणा होण्याआधी मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. २४ मार्च रोजी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २५ हजार ६३८ अंशापर्यंत खाली आला होता. ५२ आठवड्यातील सर्वात खालचा तळ गाठल्यापासून आतापर्यंत मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ७० टक्के वाढ झाली आहे.

सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळावी यासाठी आर्थिक सुधारणांवर भर दिला आहे. यासाठी आत्मनिर्भर भारत अंतर्गत वेगवेगळ्या पॅकेजची घोषणा सरकारने केली होती. त्याचे परिणाम दिसून येत आहेत. कोरोनाचे लस लवकरच येण्याची शक्यता वाढली आहे. याबाबतीत येणार्‍या सकारात्मक बातम्यांनी गुंतवणूकदारांमध्ये उत्साह वाढविला आहे. परकीय गुंतवणूकदारही भारतीय बाजाराला पसंती देत आहेत. मिड कॅप आणि स्मॉल कॅप, बँकिंग क्षेत्रात परकीय गुंतवणूकदारांचा ओढा अधिक आहे.

याशिवाय भारतीय अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने पुर्वपदावर येत असून येत्या काळात जीडीपी विक्रमी पातळीवर पोहोचलेला असेल, असा अंदाज आहे. नुकताच भारताच्या विकासदाराच्या अंदाजात आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थांनी सुधारणा केली होती. नुकताच गोल्डमन सॅच आणि त्याआधी ‘मूडीज’ने भारताच्या आर्थिक विकास दाराच्या अंदाजात सुधारणा केली होती. गोल्डमन सॅचने पुढीलवर्षी विकासदर १० टक्क्यांच्या पुढे असेल असा अंदाज वर्तविला आहे.

या पार्श्‍वभूमीवरही बाजारात तेजी दिसून येत आहे. बुधवारी पॉवर ग्रीड, एसबीआय, एल अँड टी, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स आणि ओएनजीसी या कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले. तसेच परकीय गुंतवणूकदारांनी मंगळवारच्या दिवसात ४ हजार ९०५ कोटी रुपये भारतीय शेअर बाजारात गुंतवले.

leave a reply