लोकशाहीवादी आंदोलन चिरडण्यासाठी दीड महिन्यात म्यानमारच्या लष्कराने ४५० जणांचा बळी घेतला

नेप्यितौ/यांगून – म्यानमारमध्ये लष्कराकडून लोकशाहीवादी आंदोलनाविरोधात सुरू असलेल्या कारवाईतील बळींची संख्या ४५०वर गेली आहे. त्यात शनिवारी व रविवारी लष्कराने केलेल्या क्रूर कारवाईत बळी गेलेल्या सुमारे १७० जणांचा समावेश आहे. या कारवाईदरम्यान म्यानमारच्या लष्कराने काही गावांमध्ये हवाईहल्ले चढविल्याचेही सांगण्यात येते. या हल्ल्यांमुळे जवळपास तीन हजार नागरिकांना शेजारी देश थायलंडचा आश्रय घेणे भाग पडले आहे. या लष्करी कारवाईवर आंतरराष्ट्रीय स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून अमेरिका, जपान व ब्रिटनसह १२ देशांनी संयुक्त निवेदनाद्वारे म्यानमारच्या लष्करावर टीकास्त्र सोडले आहे.

म्यानमारमध्ये गेल्या दीड महिन्यांहून अधिक काळ लष्करी बंडाविरोधात जोरदार निदर्शने सुरू आहेत. लष्कराने जबरदस्तीने ताब्यात घेतलेली सत्ता सोडावी आणि लोकशाहीवादी सरकारच्या हाती सर्व सूत्रे द्यावीत यासाठी व्यापक आंदोलन छेडण्यात आले आहे. या आंदोलनाला देशाच्या कानाकोपर्‍यातून प्रचंड समर्थन मिळाले असून बंडखोर संघटना व धार्मिक गटांनीही त्यात उडी घेतली आहे. आंदोलनाला मिळणारे हे वाढते समर्थन पाहून लष्कर चांगलेच बिथरल्याचे समोर येत आहे. आंदोलनकर्त्यांसह सामान्य जनतेत दहशत व भीतीचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी त्यांनी आपल्या कारवाईची तीव्रता अधिकच वाढविली आहे.

शनिवारी म्यानमारच्या लष्कराने केलेल्या भीषण कारवाईत ११४ जणांचा बळी गेला असून हा गेल्या दीड महिन्यांमधील सर्वाधिक रक्तरंजित दिवस ठरला आहे. त्यापाठोपाठ रविवारी म्यानमारच्या लष्कराकडून करण्यात आलेल्या कारवाईत सुमारे ३६ हून अधिक जणांचा बळी गेल्याचे सांगण्यात येते. ‘म्यानमार नाऊ’ या वेबसाईटने दिलेल्या माहितीत, दोन दिवसांमध्ये सुमारे १७० जणांचा बळी गेल्याची माहिती देण्यात आली आहे.

गेली काही दशके म्यानमारच्या लष्कराविरोधात संघर्ष करणारे वांशिक गटही लोकशाहीवादी आंदोलनात सहभागी झाले आहेत. या गटांनी दिलेले समर्थन चिरडण्यासाठी म्यानमार लष्कराने रविवारी पाच गावांमध्ये हवाईहल्ले चढविले आहेत. या हल्ल्यांमध्ये किमान तीन जणांचा बळी गेला असून अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येते. कॅरेन स्टेटमध्ये झालेल्या या हल्ल्यांनंतर गावांमधील तब्बल तीन हजार नागरिकांना थायलंडमध्ये आश्रय घेणे भाग पडले आहे. हल्ले चालू राहिल्यास ही संख्या १० हजारांपर्यंत जाऊ शकते, असा दावा स्थानिक गटांनी केला आहे.

दरम्यान, म्यानमारच्या लष्कराकडून देशातील जनतेविरोधात दाखविण्यात येणार्‍या क्रौर्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. अमेरिका, जपान व ब्रिटनसह १२ देशांच्या लष्करप्रमुखांनी संयुक्त निवेदनाद्वारे म्यानमारच्या लष्करावर टीका केली आहे. म्यानमारच्या लष्कराने पत गमावल्याचा ठपका यात ठेवण्यात आला असून हिंसेचा मार्ग सोडावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

leave a reply