‘नॉर्ड स्ट्रीम’ इंधनवाहिनीतील गूढ गळतीमागे घातपात असू शकतो

- रशियाचा दावा

घातपातमॉस्को – रशिया व युरोपिय देशांमध्ये उभारण्यात आलेल्या ‘नॉर्ड स्ट्रीम’ इंधनवाहिनीतून इंधनवायूची गळती झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या इंधनवाहिनींमधून गॅसचा पुरवठा बंद असतानाही ही गळती झाल्याने या घटनमागील गूढ अधिकच वाढले. ही गळती घातपाताचा भाग असू शकतो, असा दावा रशियाचे प्रवक्ते दिमित्रि पेस्कोव्ह यांनी केला आहे.

सोमवारी डेन्मार्कचा भाग असलेल्या ‘बॉर्नहोम आयलंड’जवळच्या सागरी क्षेत्रात ‘नॉर्ड स्ट्रीम 2’ इंधनवाहिनीत गळतीची पहिली घटना उघडकीस आली. त्यानंतर डॅनिश यंत्रणांनी या सागरी क्षेत्रातील जहाजांना पाच नॉटिकल मैलांच्या परिसरात प्रवेश न करण्याचे आदेश दिले. त्यानंतर मंगळवारी स्वीडनच्या सागरी क्षेत्रातील ‘नॉर्ड स्ट्रीम 1’ व ‘नॉर्ड स्ट्रीम 2’ या दोन्ही इंधनवाहिनीत गळतीची प्रकरणे समोर आली. ‘नॉर्ड स्ट्रीम 1’मध्ये दोन ठिकाणी गळती झाल्याचे स्वीडिश यंत्रणांनी सागितले.

घातपात‘नॉर्ड स्ट्रीम 1’ ही रशियाकडून युरोपला इंधनवायूचा पुरवठा करणारी मुख्य इंधनवाहिनी आहे. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून या इंधनवाहिनीतून होणारा पुरवठा बंद करण्यात आला आहे. युरोपिय देशांनी निर्बंध उठविले तरच पुरवठा सुरू करु, अशी आक्रमक भूमिका रशियाने घेतली आहे. तर ‘नॉर्ड स्ट्रीम 2’ इंधनवाहिनी बांधून तयार असली तरी नव्या जर्मन सरकारने परवानगी नाकारल्याने त्यातून पुरवठा सुरू झालेलाच नाही. इंधनपुरवठा बंद असतानाही इंधनवायूची गळती होण्याची घटना घडल्याने त्याबाबत गूढ निर्माण झाले आहे.

रशियन प्रवक्त्यांनी यामागे घातपाताचा प्रकार असू शकतो, असा दावा केला आहे. जर्मन माध्यमांनीही घातपाताची शक्यता वर्तविली आहे. इंधनवाहिनीतील गळतीमुळे बाल्टिक सागरी क्षेत्रातील जहाजांची वाहतूक अडचणीत आली असून त्याचा फटका युरोपिय देशांना बसू शकतो, असे सांगण्यात येते.

leave a reply