नौदलप्रमुखांकडून निकोबारमधील नौदल तळावरील सज्जतेचा आढावा

नवी दिल्ली – चीनबरोबरील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंग यांनी ग्रेट निकोबार बेटावरील ‘आयएनएस बाझ’ या तळाला भेट दिली आणि नौदलाच्या तयारीचा आढावा घेतला. हिंदी महासागरातून जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावर नजर ठेवण्यासाठी ‘आयएनएस बाझ’ महत्वाचा तळ ठरतो. चीनची व्यापारी वाहतूकही मोठ्या प्रमाणावर याच मार्गावर अवलंबून आहे. त्यामुळे नौदलप्रमुखांच्या या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

दक्षिणेकडील बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र, मलाक्काची सामुद्रीधुनी आणि दक्षिण हिंद महासागर क्षेत्रात पाळत ठेवण्यासाठी ग्रेट निकोबार बेटाच्या ‘कॅंपबेल बे’ येथील ‘आयएनएस बाझ’ तळ महत्वाची भूमिका बजावतो. मलाक्काच्या सामुद्रीधुनीतून चीनचा ७० टक्के व्यापार होत असून हा मार्ग बंद झाल्यास चीनची कोंडी होऊ शकते. त्यामुळे हिंदी महासरक्षेत्रात वर्चस्व निर्माण करण्यासाठी चीनकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

शनिवारी नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंग यांनी ‘आयएनएस बाझ’ला भेट देत येथील तयारीचा आढावा घेतला. अंदमान निकोबार कमांडचे ‘कमांडर-इन-चीफ लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी अ‍ॅडमिरल करमबीर सिंग यांना सध्य घडामोडीची माहिती दिली, असे भारतीय नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले. अ‍ॅडमिरल करमबीर सिंग यांना सुरक्षेविषयी तसेच स्ट्रक्चरल डेव्हलपमेंट आणि कमांडच्या सज्जतेबद्दल देखील माहिती देण्यात आली, अशी माहिती नौदलाच्या प्रवक्त्याने दिली.

leave a reply