नवी दिल्ली – ‘चीनने गेल्या दहा वर्षात आपल्या नौदलासाठी १३८ युद्धनौका उभारल्या आहेत. २००८ सालापासून चीनच्या नौदलाचा हिंदी महासागर क्षेत्रात वावर आहे. भारत आपल्या क्षेत्रातील घडामोडींवर नजर रोखलेली आहे. भारतीय नौदल कुठल्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे’, अशा शब्दात नवे नौदलप्रमुख ऍडमिल आर. हरी कुमार यांनी देशाला आश्वस्त केले. भारताचे नौदल संतुलित असून देशाच्या सागरी क्षेत्रातील हितसंबंधांचे रक्षण करण्याचे सामर्थ्य नौदलाकडे आहे, अशी ग्वाही नौदलप्रमुखांनी दिली.
नौदल दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ऍडमिल आर. हरी कुमार बोलत होते. यावेळी चीनच्या हिंदी महासागर क्षेत्रातील हालचालींचा दाखला देऊन याकडे भारतीय नौदलाची करडी नजर रोखलेली आहे, असे सांगून नौदलप्रमुखांनी चीनपासून असलेला धोका अधोरेखित करताना, भारतीय नौदलाकडे चीनच्या नौदलाला सडेतोड प्रत्युत्तर देण्याचे सामर्थ्य असल्याची बाब स्पष्ट केली.
‘तुमच्याकडे किती संख्याबळ आहे, याला फारसे महत्त्व नसते. तर तुमच्याकडे किती कुशल मनुष्यबळ आहे, तुम्ही शस्त्रास्त्रे कशारितीने वापरता, तुमचे डावपेच, मोहिमा राबविण्याचे आराखडे, अशा बर्याच गोष्टींवर सारे काही अवलंबून असते. भारतीय नौदल अत्यंत संतुलित शक्ती असलेले आहे. त्याचवेळी भारतीय नौदलाकडे आपल्या देशाच्या सागरी क्षेत्रातील हितसंबंधांचे रक्षण करण्याचा पूर्ण आत्मविश्वास आहे. याबाबत मी तुम्हाला आश्वस्त करतो’, असे नौदलप्रमुख या पत्रकार परिषदेत म्हणाले.
नौदलासाठी सुमारे ७२ प्रकल्प राबविले जात असून यासाठी एक लाख, ९७ हजार, ३५९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. यातील ५९ प्रकल्प स्वदेशी असल्याची माहिती नौदलप्रमुखांनी दिली. भारतीय नौदलासाठी निर्मिती केल्या जात असलेल्या ३९ युद्धनौका व पाणबुड्यांपैकी ३७ युद्धनौका व पाणबुड्या ‘मेक इन इंडिया’च्या अंतर्गत तयार होत आहेत. यासंदर्भात भारताने दहा वर्षाचा आराखडा तयार केला असून देशी बनावटीच्या मानवरहित हवाई, सागरी व स्वयंचलित यंत्रणा नौदलासाठी विकसित करण्यात येत आहेत, अशी माहिती नौदलप्रमुखांनी यावेळी दिली.
तसेच तिन्ही संरक्षणदलांचा ‘थिएटरायझेशन प्लान’ पुढच्या वर्षाच्या मध्यापर्यंत प्रत्यक्षात उतरू शकेल, अशी माहिती नौदलप्रमुखांनी दिली. तसेच या महत्त्वाकांक्षी सुधारणेचे नौदलप्रमुखांनी स्वागत केले. या सुधारणांचे नौदल मनापासून स्वागत करीत असल्याचे ऍडमिरल आर. हरी कुमार म्हणाले. दरम्यान, गेल्या वर्षी लडाखच्या एलएसीवर गलवानमध्ये भारत व चीनच्या लष्करामध्ये झालेला संघर्ष आणि कोरोनामुळे उद्भवलेले संकट, यामुळे परिस्थिती गुंतागुंतीची बनलेली आहे, याकडे नौदलप्रमुखांनी लक्ष वेधले.
अशा परिस्थितीतही भारतीय नौदल या दोन्ही आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज असल्याचा दावा नौदलप्रमुखांनी केला. नौदलाची सज्जता पाहता कुणालाही सागरी क्षेत्रात कुणीही धाडस करण्याची हिंमत दाखविणार नाही, असा विश्वास नौदलप्रमुखांनी व्यक्त केला आहे.