सीतामढी – बिहारच्या सीतामढीतल्या सोनबरसामध्ये भारत-नेपाळ सीमेवर नेपाळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका स्थानिक शेतकऱ्याचा बळी गेला असून चार जण जखमी आहेत. यातील दोघांची स्थिती गंभीर असल्याचे सांगितले जाते. तसेच एका गावकऱ्यास नेपाळ पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. बिहारमधील नेपाळला लागून असलेल्या सीमा भागात अशा प्रकारची पहिलीच घटना आहे. यानंतर भारत-नेपाळ सीमेवर तणाव निर्माण झाला असून सीमाभागात सशस्त्र सीमा बलाची (एसएसबी) तैनाती वाढविण्यात आली आहे. नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या कम्युनिस्ट सरकारने चीनच्या इशाऱ्यावर प्रसिद्ध केलेला नवा नकाशा आणि याद्वारे उकरून काढलेल्या सीमावादाशी या घटनेला जोडून पहिले जात आहे.
शुक्रवारी बिहारमधील नेपाळ सीमेनजीकच्या सोनबरसामधल्या जानकीनगर गावात ही घटना घडली. नेपाळच्या सशस्त्र पोलीस दलाचे जवान आणि सीमेनजीकच्या गावात राहणाऱ्या गावकऱ्यांमध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर नेपाळ पोलिसांनी गोळीबार केल्याचे सांगण्यात येते. सीमाभागातील शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना नेपाळ पोलिसांनी हटकल्यावर येथून निघून जाण्यास सांगण्यात आल्यावर हा वाद सुरु झाला. नेपाळ पोलिसांकडून १६ राऊंड फायरिंग झाल्याचे सुरक्षा दलाच्या सूत्रांनी म्हटले आहे. यामध्ये एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
केंद्रीय गृहमंत्रालयाने या घटनेची गंभीर दखल घेऊन ‘एसएसबी’कडे त्वरित अहवाल मागविला होता. त्यानंतर ‘एसएसबी’च्या अधिकाऱ्यांनी या संदर्भांत प्राथमिक अहवाल तयार केला असून तो केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठविण्यात आला आहे. तसेच ‘एसएसबी’च्या ५१ बटालियनच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नेपाळ पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचेही वृत्त आहे. नेपाळ सशस्त्र पोलीस आपल्याबरोबर घेऊन गेलेल्या तरुणाला सोडविण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे अधिकाऱ्याने म्हटले आहे. ‘एसएसबी’च्या अधिकाऱ्यांनी हा स्थानिक मुद्दा असल्याचा दावा केला आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी याबाबत अधिक खुलासा केलेला नाही. पण या घटनेनंतर सीमाभागात तैनाती आणि गस्त वाढविण्यात आल्याचे समोर येत आहे.
या घटनेला नेपाळने उकरून काढलेल्या सीमावादाशी जोडून पहिले जात आहे. नेपाळने आपल्या नव्या नकाशात लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापानीसह काही भारतीय गावे आपल्या नकाशात दाखविली आहेत. यासाठी नेपाळला चीनने फूस लावल्याचे दावे भारतीय विश्लेषक करीत आहेत.