काठमांडू – भारतासोबत सीमावादावरुन टोकाची भूमिका घेणारा नेपाळ नरमला आहे. नेपाळने भारतासमोर राजनैतिक पातळीवर चर्चा करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. अद्याप भारताची यावर काही प्रतिक्रिया आलेली नाही.
काही दिवसांपूर्वी भारताने व्हाया लिपुलेक कैलास मानसरोवर लिंक रोडचे उद्घाटन केले होते. त्यावेळी हा नेपाळचा भूभाग असल्याचा दावा करुन नेपाळने त्याचा निषेध केला होता. तसेच नेपाळने आपल्या नकाशात लिपुलेक, कालापानी या भारताच्या भूभागाला सामील करुन घेतले होते. याचा भारताने निषेध केला होता. या कारणामुळे दोन्ही देशांचे संबंध ताणले होते. नेपाळने सीमाभागात सैन्य तैनात करण्याची धमकी दिली होती. भारताने नेपाळच्या या धमकीकडे गांर्भीयाने पाहिले नव्हते. नेपाळ चीनच्या चिथावणीवरुन हे सर्व करीत असल्याचे भारताच्या लष्करप्रमुखांनी बजावले होते. यामुळे दोन्ही देशांचे संबंध अधिकच ताणले होते. या पार्श्वभूमीवर नेपाळने आता भारताला हा सीमावाद चर्चेने सोडविण्यासाठी प्रस्ताव दिला.
नेपाळ सीमावादावर भारतासोबत चर्चा करायला तयार आहे. तसेच नेपाळ सीमाभागात लष्कर तैनात करणार नाही, असे नेपाळचे उपपंतप्रधान आणि संरक्षणमंत्री ईश्वर पोखहरेल यांनी म्हटले. तसेच नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप कुमार ग्यावली यांनी भारताबरोबर हा वाद चर्चेने सोडविण्यावर भर दिला. नेपाळ भारताच्या प्रतिसादाची आतुरतेने वाट पहात आहे. पण अद्याप तरी भारताने यावर काही प्रतिक्रिया दिलेली नाही.