वॉशिंग्टन – अमेरिकेतील घरांच्या सरासरी किंमती व गृहकर्जाचा व्याजदर वाढत असून या गोष्टी गृहबांधणी क्षेत्रातील संभाव्य संकटाची चाहूल ठरु शकते, असा इशारा ‘फेडरल रिझर्व्ह’ने दिला आहे. यापूर्वी २००० सालानंतरच्या दशकात अशी स्थिती निर्माण होऊन २००६ साली घरांच्या किंमती कोसळल्या होत्या. या अभूतपूर्व घसरणीतून २००८-०९ साली अमेरिकेसह जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीचा भयावह फटका बसला होता. त्यामुळे फेडरल रिझर्व्हने दिलेला इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो. गेल्याच महिन्यात फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी, व्याजदरातील नव्या वाढींमुळे अमेरिकी अर्थव्यवस्थेला मोठे धक्के बसू शकतात असे बजावले होते.अमेरिकेत सध्या महागाईचा भडका उडाला असून त्याचा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिकेतील महागाई निर्देशांक ७.९ टक्क्यांवर पोहोचला असून ही गेल्या चार दशकांमधील सर्वात मोठी वाढ ठरली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या अडचणी, इंधन व पोलादासह कच्च्या मालाच्या किंमतीमध्ये झालेली वाढ आणि कामगारांची टंचाई यासारखे घटक अमेरिकेतील महागाई वाढविण्यास कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात येते. त्यात रशिया-युक्रेन युद्धाची भर पडली असून महागाईत अजून भर पडण्याचे संकेत देण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर गृहबांधणी क्षेत्रात झालेली उलथापालथ अमेरिकेसह जागतिक अर्थव्यवस्थेला मोठे धक्के देणारी ठरु शकते.
‘अमेरिकेतील घरांच्या किंमती गेल्या दोन वर्षात वाढल्या आहेत. ही वाढ पुढे कायम राहिल, असा समज बाजारपेठेत दृढ होत आहे. त्यामुळे घरांच्या किंमतींचा भडका उडू शकतो. आपण मागे पडू नये या भीतीतून अनेक जण घराची खरेदी करण्यास प्राधान्य देतील. त्यातून घरांच्या किंमतीबाबतच्या अपेक्षा अधिक वाढत राहतील. सध्याच्या स्थितीत गृहबांधणीची बाजारपेठ निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे, असे दिसते’, असे सांगून फेडरल रिझर्व्हने संभाव्य संकटाचा इशारा दिला.
‘रिऍल्टर डॉट कॉम’ या आघाडीच्या वेबसाईटने अमेरिकेतील घरांच्या किंमती गेल्या दोन वर्षात २७ टक्क्यांनी वाढल्याकडे लक्ष वेधले. मात्र ही दुहेरी आकड्यांची वाढ सतत कायम राहू शकत नाही, असेही बजावले आहे. सध्या अमेरिकेतील घराची किंमत सरासरी ४ लाख, ५ हजार डॉलर्सपर्यंत पोहोचली असून ही उच्चांकी पातळी असल्याचा दावाही विश्लेषकांकडून करण्यात आला आहे.