अंकारा – ‘तुर्की आणि इस्रायलने दाखविलेल्या भक्कम इच्छाशक्तीमुळे आज दोन्ही देशांच्या संबंधांचे नव पर्व सुरू झाले आहे’, असे तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी म्हटले आहे. इस्रायलचे पंतप्रधान नियुक्त बेंजामिन नेत्यान्याहू यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी ही घोषणा केली. दोन्ही नेत्यांनी इस्तंबूल व वेस्ट बँकमध्ये झालेल्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली.
दहा वर्षांपूर्वी गाझापट्टीसाठी रवाना केलेल्या जहाजावर इस्रायलच्या लष्कराने केलेल्या कारवाईनंतर तुर्कीने इस्रायलबरोबरचे राजनैतिक संबंध तोडले होते. पुढच्या काळात एर्दोगन यांनी इस्रायलविरोधी भूमिका स्वीकारून हमास, हिजबुल्लाहच्या नेत्यांबरोबर चर्चा सुरू केली होती. मात्र तुर्कीची अर्थव्यवस्था गाळात अडकल्यानंतर, एर्दोगन यांना इस्लामी जगताचे नेतृत्व करण्याचे स्वप्न सोडून पुन्हा एकदा इस्रायल व सौदी अरेबियाशी सहकार्य प्रस्थापित करण्याचा व्यवहार्य निर्णय घ्यावा लागला. वर्षभरापूर्वी नेत्यान्याहू यांच्या कारकिर्दीतच एर्दोगन यांनी इस्रायलबरोबर नव्याने सहकार्य प्रस्थापित करण्याची घोषणा केली होती.
लवकरच इस्रायलमध्ये नेत्यान्याहू यांचे सरकार स्थापन होणार आहे. त्याआधी एर्दोगन यांनी नेत्यान्याहू यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. या चर्चेत वेस्ट बँकमधील संघर्ष तसेच रशिया-युक्रेन युद्धाचा समावे असल्याचे सांगितले जाते.