बीजिंग – ‘डिसेंबर महिन्यात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि सौदी व ‘गल्फ कोऑपरेशन कौन्सिल’मध्ये झालेल्या बैठकीत ‘पेट्रोयुआन’चा उदय झाला आहे. चीन व आखाती देशांच्या सहकार्यातून नवी जागतिक इंधनव्यवस्था आकार घेत असून 2023 हे साल त्यातील महत्त्वाचा टप्पा ठरेल’, असा दावा युरोपातील आघाडीची वित्तसंस्था ‘क्रेडिट सूस’च्या विश्लेषकांनी केला. गेल्या शतकात अमेरिकी डॉलरला आंतरराष्ट्रीय पातळीवरील आघाडीचे राखीव चलन म्हणून मान्यता मिळवून देण्यात इंधनव्यवहारांचा प्रमुख वाटा होता. या पार्श्वभूमीवर युरोपियन विश्लेषकाचे वक्तव्य लक्ष वेधून घेणारे ठरते.
युरोपातील आघाडीच्या वित्तसंस्थांपैकी एक म्हणून ओळखण्यात येणाऱ्या ‘क्रेडिट सूस’मधील प्रमुख विश्लेषक झोल्टन पॉझ्सर यांनी आपल्या ग्राहकांना उद्देशून लिहिलेल्या नोटमध्ये बदलत्या इंधनव्यवस्थेचा उल्लेख केला आहे. ‘चीन आपले हितसंबंध समोर ठेऊन जागतिक इंधन बाजारपेठेचे नियम नव्याने लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे. पुढील काही वर्षात इंधनाचा व्यापार मोठ्या प्रमाणात युआन चलनात सुरू होईल. यामुळे जागतिक इंधन व ऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होतील’, असे पॉझ्सर यांनी बजावले.
जागतिक इंधन बाजारपेठेतील आघाडीचा गट असणाऱ्या ‘ओपेक प्लस’मधील रशिया, इराण, व्हेनेझुएला या देशांकडे 40 टक्के तर ‘गल्फ कोऑपरेशन कौन्सिल’च्या सदस्य देशांकडे 40 टक्के राखीव इंधनाचे साठे आहेत. इतर 20 टक्के राखीव साठेही चीन व रशियाच्या प्रभावक्षेत्रातील देशांमध्येच असल्याकडे युरोपिय विश्लेषकांनी लक्ष वेधले. चीनने युआन हे चलन हाँगकाँग व शांघायमध्ये उभारलेल्या ‘गोल्ड एक्सचेंज’मध्ये सोन्यात परावर्तित करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिल्याची जाणीव पॉझ्सर यांनी करून दिली. ही बाब युआनसाठी सुरक्षा कवच म्हणून काम करू शकते, असा दावा त्यांनी केला. अमेरिकी डॉलर्समधील कर्जरोखे खरेदी करणाऱ्या परदेशी ग्राहकांची संख्या कमी होत असून पेट्रोयुआनच्या वापराने वेग घेतल्यास ‘डिडॉलरायझेशन’ची आग अधिकच भडकेल, असा इशाराही पॉझ्सर यांनी दिला.
गेल्या शतकात इंधन उत्पादक देशांनी डॉलरमध्ये व्यवहार मान्य केल्याने त्याचा वापर वाढून तो सर्वमान्य राखीव चलन म्हणून प्रस्थापित झाला होता. गेली काही वर्षे चीनही युआनला आंतरराष्ट्रीय स्तरावरील चलन म्हणून मान्यता मिळविण्यासाठी धडपडत असून जगातील अनेक देशांबरोबर यासंदर्भातील करारही केले आहेत. अनेक देशांबरोबरील द्विपक्षीय व्यापारात चीनने युआनच्या वापराची अट घालून त्याचा वापर व जागतिक व्यवहारांमधील हिस्सा वाढविण्यात यश मिळविले आहे. आखाती देशांनी युआनचा वापर सुरू केल्यास जागतिक पातळीवर त्याला मान्यता मिळून त्याचा वापर प्रचंड प्रमाणात वाढू शकतो.
चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांचा दौरा यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरला होता. ‘चीन यापुढेही आखाती देशांकडून मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची आयात सुरू ठेवेल. नैसर्गिक इंधनवायूचा व्यापारही वाढविण्यात येईल. या इंधनव्यवहारांसाठी चीनकडून शांघाय पेट्रोलियम ॲण्ड नॅशनल गॅस एक्सेंजचा व्यासपीठ म्हणून वापर होईल. या माध्यमातून होणारे कच्चे तेल व इंधनवायूचे व्यवहार युआनमध्ये पार पडतील’, या शब्दात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पुढील काळात अरब देशांबरोबरील इंधनव्यवहार युआन चलनात करण्याचे संकेत दिले होते. चीन व आखाती देशांबरोबरील इंधनव्यवहारांमध्ये युआनचा वापर सुरू झाल्यास ही बाब अमेरिकी डॉलरच्या वर्चस्वासाठी सर्वात मोठा धक्का ठरु शकतो.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील इंधनव्यवहारात ‘पेट्रोयुआन’चा वापर ही बाब जागतिक स्तरावरील अमेरिकेचे महासत्तापदही धोक्यात आणू शकते, याकडे तज्ज्ञ व विश्लेषक सातत्याने लक्ष वेधत असून पॉझ्सर यांचा दावा त्याचाच भाग ठरतो.
हिंदी