चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’कडून तैवानच्या हद्दीत नवी घुसखोरी

तैवानच्या हद्दीततैपेई/बीजिंग – चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या दोन विमाने व व दोन हेलिकॉप्टर्सनी तैवानच्या हवाईहद्दीत घुसखोरी केल्याचे उघड झाले. शुक्रवारी ही घुसखोरी झाल्याची माहिती तैवानच्या संरक्षण विभागाने दिली. घुसखोरी होण्यापूर्वी तैवानच्या संरक्षणदलांनी सागरी क्षेत्रात ‘लाईव्ह फायर ड्रिल्स’चे आयोजन केले होते. यावर लक्ष ठेवण्यासाठी ही घुसखोरी करण्यात आली असावी, असा दावा तैवानी सूत्रांनी केला आहे. एप्रिल महिन्यातील ही घुसखोरीची सातवी घटना असल्याचेही तैवानकडून सांगण्यात आले.

शुक्रवारी तैवानच्या ‘एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन’मधील (एडीआयझेड) नैॠत्य भागातून चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीची दोन विमाने व दोन हेलिकॉप्टर्स घुसली. विमानांमध्ये एक लढाऊ विमान व ‘इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर प्लेन’चा समावेश होता. या विमानांबरोबरच ‘सीएआयसी डब्ल्यूझेड-१० अटॅक हेलिकॉप्टर’ तसेच ‘एमआय-१७ कार्गो हेलिकॉप्टर’ही ‘एडीआयझेड’मध्ये घुसल्याचे तैवानच्या संरक्षण विभागाने सांगितले. चीनच्या संरक्षणदलांनी तैवानमधील घुसखोरीसाठी हेलिकॉप्टर्सचा वापर करण्याची गेल्या वर्षभरातील ही पहिलीच घटना ठरली आहे.

तैवानच्या हद्दीतचीनकडून तैवानच्या हद्दीतील घुसखोरी हा ‘ग्रे झोन वॉरफेअर’चा भाग मानला जातो. तैवानच्या संरक्षणदलांची क्षमता कमी करण्यासाठी चीनने या धोरणाचा वापर सुरू केला आहे. गेल्या दोन वर्षात हा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चीन नजिकच्या काळात हल्ला करण्याची तयारी करीत असल्याचे दावे तैवानी विश्‍लेषक व अधिकारी तसेच माध्यमे करीत आहेत. चीनच्या ‘ग्रे झोन वॉरफेअर’चा मुकाबला करण्यासाठी तैवाननेही जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

जानेवारी महिन्यात तैवानने आपल्या संरक्षणखर्चात साडेआठ अब्ज डॉलर्सची अतिरिक्त वाढ करीत असल्याचे जाहीर केले होते. या वाढीनंतर तैवानचा संरक्षणखर्च १७ अब्ज डॉलर्सवर गेला असून हा आतापर्यंतचा रेकॉर्ड मानला जातो. अतिरिक्त तरतुदीचा वापर तैवान प्रगत क्षेपणास्त्रे, लढाऊ विमाने, ड्रोन्स, विनाशिका व पाणबुड्या यांच्यासाठी करणार असल्याचे मानले जाते.

leave a reply