आफ्रिकेतील बुर्किना फासोत नवे लष्करी बंड

burkina faso coupबुर्किना फासो – आफ्रिकेतील ‘साहेल रिजन’चा भाग असणाऱ्या बुर्किना फासोत नवे लष्करी बंड झाल्याचे वृत्त आहे. शनिवारी लष्कराच्या एका गटाने सरकारी वृत्तवाहिनीचा ताबा घेऊन राष्ट्राध्यक्ष बनलेल्या लेफ्टनंट कर्नल पॉल दमिबा यांची राजवट उलथल्याचा दावा केला. दमिबा यांना फ्रान्सचे समर्थन असल्याचे सांगण्यात येत असून देशातील फ्रेंच दूतावास व इतर उपक्रमांविरोधात निदर्शने झाल्याचे समोर आले आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात लेफ्टनंट कर्नल पॉल दमिबा यांनी देशातील लोकशाहीवादी सरकार उलथून सत्ता हातात घेतली होती. सत्तेची सूत्रे मिळविताना लोकशाहीवादी सरकार हिंसाचार व दहशतवादी हल्ले रोखण्यात अपयशी ठरल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र त्यानंतर गेल्या नऊ महिन्यात हिंसाचार व हल्ल्यांची तीव्रता कमी करण्यात दमिबा यांनाही अपयश आले होते. त्यामुळे नाराज असलेल्या लष्करातील एका गटाने बंड केल्याचे सांगण्यात येते.

बंडानंतर देशाची सूत्रे कॅप्टन इब्राहिम त्राओरे यांनी हाती घेतल्याचे जाहीर करण्यात आले. देशाच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या असून संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. सरकार व संसदही बरखास्त केल्याचे आदेश देण्यात आले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघटनेने बंडाच्या नव्या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

leave a reply