ब्रुसेल्स/वॉशिंग्टन/मॉस्कोे – गेल्या २४ तासात आर्मेनिया-अझरबैजान सीमेवर पुन्हा संघर्ष भडकला आहे. अझरबैजानने नागोर्नो-काराबाख सीमेतील गावांवर ड्रोन तसेच मॉर्टर्सचे हल्ले केल्याचा तसेच एक गाव ताब्यात घेतल्याचा दावा आर्मेनियाने केला आहे. यावेळी झालेल्या चकमकींमध्ये दोन्ही बाजूंच्या सात जवानांचा बळी गेला असून १०हून अधिक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येते. अझरबैजानने या दाव्यांचे खंडन केले असून आर्मेनिया अपप्रचार करीत असल्याचा आरोप केला आहे. गेल्या चार महिन्यात आर्मेनिया-अझरबैजानमध्ये संघर्ष भडकण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे.
गुरुवारी संध्याकाळपासून अझरबैजानच्या लष्कराकडून हल्ल्यांना सुरुवात झाली. अझरबैजानच्या लष्कराने नागोर्नो-काराबाखमधील फारुख नावाच्या गावात प्रवेश करून त्यावर ताबा मिळविल्याचे समोर आले आहे. यावेळी स्थानिक लष्करी तुकड्या तसेच रशियन शांतीसेनेच्या जवानांनी प्रत्युत्तर न दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अझरबैजानच्या लष्कराकडून हल्ल्यासाठी तुर्की ड्रोनचाही वापर करण्यात आला.
या चकमकीत नागोर्नो-काराबाखमधील दोन आर्मेनियन जवानांचा बळी गेला असून पाच जवान जखमी झाले आहेत. अझरबैजानचे पाच जवान मारले गेले असून अनेक जण जखमी झाल्याचेही आर्मेनियाकडून सांगण्यात आले. नोव्हेंबर महिन्यानंतर आर्मेनिया व अझरबैजानमध्ये संघर्ष होण्याची ही दुसरी घटना आहे. त्यावेळी झालेल्या संघर्षात २२ जवानांचा बळी गेला होता. मात्र रशियाने तातडीने मध्यस्थी करून संघर्षबंदी घडविली होती. मात्र सध्या रशिया युक्रेनमधील संघर्षात गुंतला असल्याने आर्मेनिया-अझरबैजानमधील चकमकींकडे त्याचे दुर्लक्ष होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. नव्या संघर्षावर अमेरिकेकडून प्रतिक्रिया उमटली असून अझरबैजानी लष्कराच्या हालचालींवर तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
२०२० साली आर्मेनिया व अझरबैजानमध्ये ४४ दिवसांचा संघर्ष पेटला होता. नागोर्नो-काराबाखवरील नियंत्रणावरुन भडकलेल्या या संघर्षात ६५०० हजारांहून अधिक जणांचा बळी गेल्याचा दावा केला जातो. अझरबैजानला या संघर्षात विजय मिळाला होता. आर्मेनियाविरोधातील या संघर्षात तुर्की तसेच पाकिस्तानने अझरबैजानला सहाय्य केल्याचा आरोप त्यावेळी झाला होता. रशियाच्या मध्यस्थीनंतरच हा संघर्ष थांबला होता.