भारतीय लष्कराला नवा गणवेश

- आर्मी दिनानिमित्ताने पहिल्यांदा सादरीकरण

नवी दिल्ली – भारतीय लष्कराचा पोशाख हा आता नव्या स्वरुपात असणार आहे. शनिवारी आर्मी डे निमित्त दिल्लीत पार पडलेल्या संचलनात या नव्या पोशाखाचे प्रथमच सर्वांसमोर सादरीकरण करण्यात आले. यावेळी भारतीय लष्कराच्या काळानुरुप बदलत गेलेले पोषाखही या संचलनात सादर झाले. हे युनिफॉर्म संपूर्णत: भारतीय बनावटीच्या कपड्यांनी बनलेले आहेत. २०२० सालात चीनबरोबर गलवानमध्ये झालेल्या संघर्षानंतर भारत सरकारने काही दिवसात आत्मनिर्भर भारत धोरणाची घोषणा केली होती. यानुसार लष्कराच्या युनिफॉर्मसाठी येणारे कापड आयात न करता भारतातच बनविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याआधी भारतील लष्कराच्या पोषाखाकरीता चीन, तैवानमधून कापडाची आयात करण्यात येत होती. त्यानंतर लष्कराच्या पोषाखाच्या पॅटर्नमध्येही बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

भारतीय लष्कराला नवा पोषाख - आर्मी दिनानिमित्ताने पहिल्यांदा सादरीकरणशनिवारी आर्मी डे पार पडला. यावेळी भारतीय लष्करासाठी तयार करण्यात आलेल्या नव्या डिझाईनच्या पोषाखाचे प्रथमच देशासमोर सादरीकरण करण्यात आले होते. आर्मी डे निमित्ताने दिल्ली कँट येथील लष्कराच्या परेड ग्राऊंडवर पार पडलेल्या संचलनात काळनुरुप बदलत गेलेले पोशाख घालून लष्कराने संचलन झाले. यावेळी पॅराशूट रेजिमेंटच्या कमांडोंनी हा पोषाख परिधान केला होता.

लष्कराचा पोषाख सुरक्षेच्या दृष्टीने बदलण्यावर याआधी विस्तृत चर्चा व अभ्यास झाला. इतर देशांच्या लष्करी पोषाखांचाही अभ्यास करण्यात आला. शत्रू देशांच्या सैनिकांची दिशाभूल करण्यासाठी डिजिटल कॅमोफ्लॉज पॅटर्नचा वापर करण्याचा निर्णय झाला. यामुळे लपून बसलेल्या लष्कराचे जवान शूत्र देशांना चटकन लक्षात येणार नाहीत. अमेरिकी, ब्रिटीश लष्करासह काही देश डिजिटल कॅमोफ्लॉज पॅटर्न असलेल्या पोशाखांचा वापर करतात. तसेच या नव्या पोषाखाचा पॅटर्न कोणत्याही भूप्रदेशात वापरता येईल, यादृष्टीने तयार करण्यात आला आहे. सध्या निरनिराळ्या भूप्रदेशासाठी निरनिराळ्या पोषाखाचा वापर करण्यात येत आहे. जंगल युद्ध आणि वाळवंटी युद्धासाठी निरनिराळे पोषाख होते.

तसेच लष्करासाठी पोषाख निवडताना कपड्याचाही विशेष विचार करण्यात आला. भारतीय लष्करातील पुरुष व महिला जवानांना सुलभ असावा, तसेच कोणत्याही वातावरणात वापरता येईल व टीकाऊ ठरेल यादृष्टीने कॉटन आणि पॉलिस्टर मिश्रित कापडाची निवड करण्यात आली आहे. भारतीय लष्कराला नवा पोषाख - आर्मी दिनानिमित्ताने पहिल्यांदा सादरीकरणतसेच वजनाने हलक्या व चटकन वाळेल यादृष्टीनेही कापड निवडताना विचार करण्यात आला आहे. हे कापडही संपूर्णपणे भारतीय बनावटीचे आहे. गेल्यावर्षीपर्यंत भारतीय लष्कराच्या पोषाखासाठी वापरण्यात येणारा कापड हे चीन, तैवान व दक्षिण कोरियासारख्या देशातून आयात करण्यात येत होते. मात्र भारताने आत्मनिर्भर भारत धोरणाअंतर्गत भारतातच लष्कराच्या पोशाखासाठी कापड निर्मिती सुरू केली आहे. डीआरडीओच्या मार्गदर्शनाखाली ही कापड निर्मिती करण्यात आली आहे.

दरम्यान, लष्कराच्या नव्या पोषाखाचे डिझाईन आणि पॅटर्न हे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीने (एनआयएफटी) तयार केले आहेत. सर्व बाबींचा विचार करून व लष्करी अधिकार्‍यांची चर्चा करून कपड्यासाठी वापरण्यात येणार्‍या साहित्याचा, तसेच एनआयएफटीकडून १५ पॅटर्न, आठ डिझाईन आणि चार प्रकारच्या कापडांचा पर्याय लष्कराला देण्यात आला होता. त्यातून शनिवारी आर्मी डेला सादर झालेल्या पोशाखाची निवड लष्कराने केली आहे. ऑगस्ट महिन्यापासून लष्कराकडून या नव्या पोषाखाचा वापर संपूर्णपणे सुरू होईल, असे वृत्त आहे.

leave a reply