उत्तर कोरियाच्या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणीवर अमेरिकेचे नवे निर्बंध

आंतरखंडीय बॅलेस्टिकसेऊल – ‘काही तासांपूर्वी आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेऊन उत्तर कोरियाने आम्ही आण्विक सामर्थ्यात वाढ केल्याचा संदेश जगाला दिला आहे. यापुढे पाश्‍चिमात्य देशांच्या कुठलीही धमकी किंवा ब्लॅकमेलसमोर उत्तर कोरिया झुकणार नाही. साम्राज्यवादी अमेरिकेचा सामना करण्यासाठी उत्तर कोरिया सज्ज आहे’, अशी धमकी उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जॉंग-उन यांनी दिली. यानंतर अमेरिकेने उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाशी संबंधित असलेल्यांवर निर्बंध लादले. यामध्ये उत्तर कोरियासह रशिया तसेच चीनमधील व्यक्ती व संघटनांचा समावेश आहे.

उत्तर कोरियाने गुरुवारी सकाळी ‘हॅसॉंग-१७’ या आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. जवळपास ६,२०० किलोमीटर उंचीपर्यंत प्रवास केल्यानंतर सदर क्षेपणास्त्र उत्तर कोरिया आणि जपानमधील सागरी क्षेत्रात कोसळले. ६७ मिनिटे हवेत असणार्‍या या क्षेपणास्त्राने १,०९० किलोमीटर अंतरापर्यंत प्रवास केल्याचे उत्तर कोरियाने शुक्रवारी जाहीर केले. आपल्या या क्षेपणास्त्राने आवश्यक ते सारे निकष पार पडल्याचे सांगून उत्तर कोरियाने याबाबतचा व्हिडिओ प्रसिद्ध केला.

आंतरखंडीय बॅलेस्टिकयामध्ये हुकूमशहा किम जॉंग-उन यांना हॉलिवूडपटाप्रमाणे लेदर जॅकेट घालून क्षेपणास्त्राजवळून चालताना दाखविले आहे. तसेच या चाचणीद्वारे आपल्या आण्विक सामर्थ्यात वाढ केल्याचा दावा उत्तर कोरियाने केला. २०२० साली ऑक्टोबर महिन्यात लष्करी संचलनात उत्तर कोरियाने सर्वप्रथम हे क्षेपणास्त्र जगासमोर मांडले होते. पण गुरुवारी या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी पार पडली.

दक्षिण कोरिया आणि जपानच्या लष्करी विश्‍लेषकांच्या मते, हॅसॉंग-१७ क्षेपणास्त्र १५,००० किलोमीटरपर्यंत मारा करू शकते. त्यामुळे उत्तर कोरियाच्या या क्षेपणास्त्राच्या मारक टप्प्यात अमेरिकेतील अतिपूर्वेकडील भूभागही येत असल्याचा दावा केला जातो. उत्तर कोरियाने ही चाचणी घेतल्यानंतर अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी जपान व दक्षिण कोरियाच्या संरक्षणमंत्र्यांशी फोनवर चर्चा केली. यानंतर अमेरिकेने उत्तर कोरियावर नवे निर्बंध जाहीर केले.

या क्षेपणास्त्राचे संशोधन तसेच निर्मितीमध्ये उत्तर कोरियाला सहाय्य करणारे अधिकारी व संघटनांवर अमेरिकेने हे निर्बंध लादले आहेत. यामध्ये उत्तर कोरियाबरोबरच रशिया आणि चीन या मित्रदेशांमधील अधिकारी व संघटनांचा समावेश असल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी दिली. पण अमेरिकेच्या या निर्बंधांमुळे ध्येयपूर्तीच्या उत्तर कोरियाच्या प्रयत्नांमध्ये फरक पडणार नसल्याचे रशियाने म्हटले आहे.

leave a reply