नवी दिल्ली – लडाखच्या एलएसीवरील वाद सोडविण्यासाठी भारत आणि चीनमध्ये चर्चेची नववी फेरी सुरू होत आहे. रविवारी सकाळी ९.३० वाजता दोन्ही देशांचे वरिष्ठ लष्करी अधिकारी या चर्चेत सहभागी होतील. याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध होत असतानाच, एलएसीवर चीनचे हेर सक्रीय असल्याचे उघड झाले आहे. यामुळे भारतीय सैन्य अधिक सतर्क बनले आहे. चीनने लडाखच्या एलएसीवरून आपले जवान मागे घेतल्याखेरीज भारत इथून सैन्य माघारी घेणार नाही, असा इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी दिला आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून चीनच्या लडाखच्या एलएसीवरील तसेच सिक्कीम व अरुणाचल प्रदेशच्या एलएसीवरील हालचाली वाढल्याचे दिसत आहे. वायुसेनेचा ‘दौलत बेग ओल्डी’ (डीबीओ) तळ चीनच्या निशाण्यावर असल्याचे याआधी उघड झाले होते. भारतीय वायुसेनेने या तळावरील तैनाती वाढविली आहे. लडाखमध्ये संघर्ष पेटलाच तर ‘डीबीओ’मुळे भारताला चीनवर मात करणे सहज शक्य होईल, असे सामरिक विश्लेषक सांगत आहेत. तसेच चीन व पाकिस्तानला जोडणार्या काराकोरम महामार्गालाही ‘डीबीओ’द्वारे सहज लक्ष्य करता येऊ शकते, याची भीती चीनला वाटत आहे.
यामुळे चीन डीबीओ ताब्यात घेण्यासाठी हालचाली करू शकतो, असा इशारा काही विश्लेषकांनी याआधी दिला होता. मात्र या क्षेत्राजवळ चीनच्या हेरांचा वावर असल्याची माहिती माध्यमांमध्ये उघड झाल्याने, चीन डीबीओबाबतचा हा कट प्रत्यक्षात उतरविण्याची तयारी करीत असल्याची दाट शक्यता समोर येत आहे. दरम्यान, रविवारी होणार्या चर्चेच्या फेरीआधी चीन अशा स्वरुपाच्या कारवाया करून आपण लडाखच्या एलएसीवरचा वाद सोडविण्याबाबत गंभीर नसल्याचे दाखवून देत आहे.
एकीकडे चर्चा सुरू ठेवून दुसर्या बाजूला आक्रमक लष्करी हालचालींद्वारे भारताला धक्का देण्याचा कट चीनने आखलेला असू शकतो. त्यामुळे भारताने चर्चा व वाटाघाटी करीत असताना, लडाखच्या एलएसीसीवरून सैन्य माघारी घेण्याची चूक करू नये. चीनवर विश्वास ठेवणे महाग पडेल, असा इशारा माजी लष्करी अधिकार्यांकडून दिला जात आहे. आत्ताच्या काळात लडाखच्या एलएसीवर लष्करीदृष्ट्या भारत चीनवर वर्चस्व गाजवित आहे. अशा परिस्थितीत इथून सैन्य माघारी घेण्याची चूक करून भारताने चीनला सवलत दिलीच, तर चीन पुन्हा भारताच्या विरोधात चिथावणीखोर कारवाया केल्यावाचून राहणार नाही, असेही माजी लष्करी अधिकारी बजावत आहेत.
या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. एलएसीवरून चीनने आपले लष्कर मागे घेतल्याखेरीज भारतीय सैन्य इथून माघार घेणार नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केले. रविवारी होणार्या चर्चेच्या आधी याबाबतची भूमिका स्पष्टपणे मांडून भारताने चीनला योग्य तो इशारा दिल्याचे दिसत आहे. भारताने लडाखच्या एलएसीवर पँगाँग सरोवराच्या दक्षिणकडे असलेल्या मोक्याच्या टेकड्यांचा ताबा सोडून द्यावा व इथून सैन्य माघारी घ्यावे, अशी मागणी चीन करीत आहे. भारताकडून तशी अपेक्षा ठेवणारा चीन, या ठिकाणाहून आपले लष्कर माघारी घेण्याची भारताची मागणी मान्य करण्यास तयार नाही. यामुळे चीनचा कुटील डाव उघड झाल्याचा आरोप भारतीय विश्लेषकांकडून केला जात आहे.