सेऊल – ‘हुकूमशहा किम जॉंग-उन यांच्या राजवटीने लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची चाचणी केली, तर कोरियन क्षेत्रातील संकटाची तीव्रता वाढेल. पाच वर्षापूर्वी प्रमाणे या क्षेत्रात मोठा तणाव निर्माण होईल’, असा इशारा दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मुन जे-इन यांनी दिला. दोन दिवसांपूर्वी उत्तर कोरियाने लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी करण्याचे जाहीर केले होते. यावर दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांची प्रतिक्रिया आली आहे.
जानेवारी महिन्यापासून आत्तापर्यंत उत्तर कोरियाने सात फेर्यांमध्ये क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेतल्या आहेत. यामध्ये लघु, मध्यम तसेच बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा समावेश होता. पण यापुढे जाऊन उत्तर कोरियाने लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी करण्याचे जाहीर केले आहे. किम जॉंग-उन यांच्या राजवटीने ही चाचणी केल्यास चार वर्षांपूर्वी केलेल्या कराराचे उल्लंघन ठरेल. तसेच गेल्या काही वर्षांपासून कोरियन क्षेत्रात निर्माण झालेली शांतता निकालात निघेल, असा इशारा दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष जे-इन यांनी दिला.
उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्या या क्षेत्रातील तणाव वाढवीत आहे, असा आरोप करून अमेरिकेने उत्तर कोरियावर नवे निर्बंध लादण्याची तयारी केली आहे. पण अमेरिकेचे उत्तर कोरियावरील निर्बंध अयोग्य असल्याची टीका चीन करीत आहे. तसेच अमेरिकेने उत्तर कोरियावरील निर्बंध मागे घ्यावे, अशी मागणीही चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे.
दरम्यान, अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉइड ऑस्टिन यांनी देखील दक्षिण कोरिया आणि जपानच्या संरक्षण मंत्र्यांबरोबर उत्तर कोरियापासून असलेल्या धोक्यावर चर्चा केली.