अरुणाचल प्रदेशच्या एलएसीजवळील चीनच्या बांधकामाची चिंता नको

- संरक्षण विभागातील सूत्रांची ग्वाही

नवी दिल्ली – अरुणाचल प्रदेशातील एलएसीवर चीनने गाव वसविले असून इथे १०० घरे उभारल्याचे अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनच्या एका अहवालात नमूद करण्यात आले होते. भारतीय माध्यमांनी ही बातमी उचलून धरली. मात्र गेल्या सहा दशकांपासून अरुणाचल प्रदेशच्या एलएसीचा हा भाग चीनच्या ताब्यात आहे. चीनने एकाएकी अतिक्रमण करून हा भाग बळकावून इथे गाव वसवलेले नाही. त्यामुळे त्याची फारशी चिंता करण्याचे कारण नाही, असे भारताच्या संरक्षण विभागातील सूत्रांनी म्हटले आहे. त्याचवेळी इथल्या चीनच्या हालचालींवर भारतीय सैन्याची करडी नजर रोखलेली आहे, अशी ग्वाही या सूत्रांकडून दिली जात आहे.

अरुणाचल प्रदेशच्या एलएसीजवळील चीनच्या बांधकामाची चिंता नको - संरक्षण विभागातील सूत्रांची ग्वाहीलडाखपासून अरुणाचल प्रदेशच्या एलएसीवर चीन जोरदार लष्करी हालचाली व सराव करून आपण इथे वर्चस्व गाजवित असल्याचा आभास निर्माण करीत आहे. त्याचवेळी चीन आपल्या लष्कराची भारतीय सैन्याशी टक्कर होणार नाही, यासाठीही विशेष सावधानता बाळगत आहे. मात्र लष्करी हालचालींद्वारे आपण भारताच्या विरोधात बरेच काही करीत असल्याचे दाखविणे ही सध्या चीनची गरज बनलेली आहे. अरुणाचल प्रदेशच्या एलएसीवर चीनने गाव उभारण्याची तयारी केली असून इथे १०० घरे बांधली आहेत. अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय असलेल्या पेंटॅगॉनने अमेरिकन संसदेसमोर मांडलेल्या अहवालात याची नोंद करण्यात आली.

भारतीय लष्कराच्या ‘आसाम रायफल्स’ची चौकी असलेल्या या भागाचा चीनने १९५९ साली अवैधरित्या ताबा घेतला होता. तेव्हापासून हा भूभाग चीनच्या नियंत्रणाखाली आहे. गेल्या साठ वर्षांपासून आपल्या नियंत्रणात असलेल्या या भूभागात चीन उभारत असलेल्या गावाचे बांधकाम बंद पाडता येऊ शकत नाही, असे संकेत संरक्षण विभागाशी निगडीत असलेल्या सूत्रांकडून दिले जात आहे. मात्र चीनच्या या क्षेत्रातील हालचालींवर भारतीय सैन्याची नजर रोखलेली आहे. चीन या क्षेत्रात भारतीय सैन्याला धक्का देऊ शकणार नाही, याची पूर्णपणे दक्षता घेतली जात आहे. वरिष्ठ लष्करी अधिकारी व राजकीय नेतृत्त्वाने तशी ग्वाही दिलेली आहे.

दरम्यान, एकीकडे एलएसीवर आक्रमक हालचाली करून भारतावर दबाव टाकू पाहणारा चीन दुसर्‍या बाजूला भारतीयांनी आपल्यावर टाकलेला व्यापारी बहिष्कार मागे घ्यावा, असे आवाहन करीत आहे. भारत व चीनमधील द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज डॉलर्सच्याही पुढे गेला आहे. याचा दाखला देऊन दोन्ही देशांनी व्यापारी सहकार्य अधिकाधिक वाढवावे, असे आवाहन चीनचे सरकरी वर्तमानपत्र ग्लोबल टाईम्सने केले. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार वाढत असल्याचे दिसत असले तरी दिवाळीच्या काळात भारतीयांनी चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकल्यामुळे चीनचे सुमारे सात अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले होते. पर्याय मिळाल्यास भारतीय ग्राहक चिनी उत्पादनांकडे नक्कीच पाठ फिरवतील, असा संदेश यामुळे चीनला मिळालेला आहे.

कोरोनाच्या संकटामुळे जागतिक अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने व चीनची अंतर्गत आर्थिक स्थिती लक्षात घेता, भारतासारखी मोठी बाजारपेठ गमावणे चीनसाठी घातक बाब ठरेल. याची जाणीव झाल्यानेच, आधीच्या काळात भारतीय ग्राहकांना चिनी उत्पादनांखेरीज पर्याय नसल्याचे दावे ठोकणार्‍या ‘ग्लोबल टाईम्स’ने आता भारताला आवाहन करण्याची भूमिका स्वीकारली आहे.

मात्र दोन्ही देशांमधील व्यापारी तसेच इतर पातळ्यांवरील संबंध पूर्ववत होण्यासाठी, सीमेवर शांतता व सौहार्द असणे अत्यावश्यक ठरते. यासाठी चीनने दोन्ही देशांमध्ये झालेल्या सीमा नियोजन कराराचे काटेकोरपणे पालन करावे, असा इशारा भारताने चीनला दिलेला आहे. त्याकडे दुर्लक्ष करण्याचे गंभीर परिणाम चीनला सर्वच स्तरांवर सहन करावे लागतील, हे भारत वारंवार लक्षात आणून देत आहे.

leave a reply