सेऊल – क्षेपणास्त्र चाचण्या करून कोरियन क्षेत्रात खळबळ माजविणाऱ्या उत्तर कोरियाने आता अणुचाचणीची तयारी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तर कोरिया आपल्याविरोधातील धोक्यांना अणुहल्ल्याने उत्तर दिले जाईल, असे धमकावले होते. त्यानंतर या देशाने अणुचाचणीसाठी सुरू केलेल्या हालचालींमुळे दक्षिण कोरिया सावध झाला असून दक्षिण कोरियन राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय 24 सात स्टँडबायवर असल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र अमेरिकेने केलेला दक्षिण कोरियाच्या संरक्षणाच्या वज्रनिर्धाराकडे कुणीही दुर्लक्ष करू नये, हे संरक्षण अणुचाचणीपासून संभवणाऱ्या धोक्यांविरोधातही कायम असेल, असे दक्षिण कोरियातील अमेरिकेचे राजदूत फिलिप गोल्डबर्ग यांनी म्हटले आहे.
उत्तर कोरियाने गेल्या काही दिवसांपासून बेजबाबदारपणे क्षेपणस्त्रांच्या चाचण्या केल्या होत्या. अमेरिका व दक्षिण कोरियाच्या युद्धसरावावर आपली ही प्रतिक्रिया असल्याचा दावा उत्तर कोरियाने केला होता. तसेच दक्षिण कोरियासह अमेरिकेलाही अणुहल्ल्याच्या धमक्या देणाऱ्या उत्तर कोरियाने अणुचाचणीसाठी हालचाली सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत. म्हणूनच दक्षिण कोरिया अत्यंत सावधपणे याकडे पाहत आहे. उत्तर कोरियाकडून संभवणारा हा आण्विक धोका लक्षात घेता, अमेरिकेने दक्षिण कोरियात अण्वस्त्रे तैनात करावी, अशी मागणी दक्षिण कोरियाकडून करण्यात आली होती. दक्षिण कोरियाच्या संरक्षणासाठी वचनबद्ध असलेल्या अमेरिकेने त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला.
दक्षिण कोरियात अमेरिका आपली अण्वस्त्रे तैनात करू शकणार नाही. मात्र दक्षिण कोरियाच्या संरक्षणासाठी अमेरिका वचनबद्ध असून त्यासाठी अमेरिकेने केलेल्या वज्रनिर्धाराकडे कुणीही दुर्लक्ष करता कामा नये. अगदी आण्विक धोक्याच्या पार्श्वभूमीवरही अमेरिकेचा हा निर्धार कायम असेल, असे राजदूत गोल्डबर्ग यांनी म्हटले आहे. त्याचवेळी दक्षिण कोरियाला आपल्या टॅक्टीकल अण्वस्त्रांच्या हल्ल्याची धमकी देणाऱ्या उत्तर कोरियावर अमेरिकेच्या राजदूतांनी सडकून टीका केली. उत्तर कोरियाच्या या धमक्या बेजबाबदार आणि अत्यंत घातक ठरतात, असे राजदूत गोल्डबर्ग म्हणाले.
अण्वस्त्रांची धमकी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याकडून किंवा उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग ऊन यांच्याकडून येवो, ती बाब सारखीच निषेधार्ह ठरते. यामुळे परिस्थिती अधिकच चिघळते, असा इशारा गोल्डबर्ग यांनी दिला आहे.