२३ क्षेपणास्त्रे डागून उत्तर कोरियाचे दक्षिण कोरियासह अमेरिकेला आव्हान

दक्षिण कोरियानेही तीन क्षेपणास्त्रे प्रक्षेपित करून प्रत्युत्तर दिले

north korea missileसेऊल – अमेरिका आणि दक्षिण कोरियामध्ये सुरू असलेल्या ‘व्हिजिलंट स्टॉर्म’ हवाई सराव सुरू असतानाच, उत्तर कोरियाने २३ क्षेपणास्त्रे डागून कोरियन क्षेत्रात खळबळ माजविली. यापैकी एक क्षेपणास्त्र दक्षिण कोरियाच्या किनारपट्टीपासून अवघ्या ६० किलोमीटर अंतरावर कोसळले. यानंतर दक्षिण कोरियाने आपल्या नागरिकांसाठी अलर्ट जारी केला. आपल्या हवाईहद्दीचे उल्लंघन अजिबात खपवून घेणार नसल्याचे सांगून दक्षिण कोरियाच्या लढाऊ विमानाने उत्तर कोरियन सागरी हद्दीत क्षेपणास्त्रे डागल्याची माहिती समोर येत आहे. पहिल्यांदाच दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीला इतके आक्रमक प्रत्युत्तर दिल्याचे आंतरराष्ट्रीय विश्लेषक लक्षात आणून देत आहेत.

Korea_jet missileअमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या हवाईदलात सुरू असलेल्या ‘व्हिजिलंट स्टॉर्म’ या आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या हवाईसरावावर उत्तर कोरियाने काही तासांपूर्वी संताप व्यक्त केला होता. तसेच उत्तर कोरियाने अमेरिकेला तितकेच सामर्थ्यशाली प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली होती. सतत दक्षिण कोरियाला धमकावणाऱ्या उत्तर कोरियाच्या या धमकीकडे अमेरिकेने दुर्लक्ष करण्याची चूक करू नये, असे अमेरिकी विश्लेषकांनी बजावले होते. यावेळी उत्तर कोरिया कुठल्याही थराला जाऊ शकतो, याची जाणीव विश्लेषकांनी मंगळवारीच करून दिली होती.

बुधवारी सकाळी उत्तर कोरियाने दोन्ही कोरियन देशांच्या वादग्रस्त सागरी सीमेच्या दिशेने २३ क्षेपणास्त्रे डागून आपली धमकी पोकळ नसल्याचा इशारा दिला. यातील एक क्षेपणास्त्र ‘नॉर्दन लिमिट लाईन’ ओलांडून दक्षिण कोरियाच्या सागरी हद्दीत कोसळले. दक्षिण कोरियाच्या पूर्वेकडील सोक्चो किनारपट्टीपासून ६० किलोमीटर तर उलूंग बेटापासून १६७ किलोमीटर अंतरावर हे क्षेपणास्त्र कोसळले. उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्राने नॉर्दन लिमिट लाईन ओलांडताच दक्षिण कोरियामध्ये तसेच उलूंग बेटावर एअर-सायरन घणाणू लागले. उलूंगवरील नागरिकांना बेट सोडण्याचे आदेशही दक्षिण कोरियाने दिले होते.

korea mapउत्तर कोरियाच्या या क्षेपणास्त्राने आपल्या हवाईहद्दीचे उल्लंघन केल्याचा आरोप दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सूक-येओल यांनी केला. तसेच राष्ट्राध्यक्ष येओल यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा समितीची तातडीची बैठक पार पडली. यानंतर दक्षिण कोरियाने देखील नॉर्दन लिमिट लाईनच्या दिशेने आपले लढाऊ विमान रवाना करून उत्तर कोरियाच्या सागरी हद्दीत क्षेपणास्त्रे डागली. दक्षिण कोरियाने एकूण तीन क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा केला जातो. दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने या संपूर्ण हवाई कारवाईचा व्हिडिओ प्रसिद्ध करून उत्तर कोरियाला इशारा दिला.

दरम्यान, राष्ट्राध्यक्ष येओल यांनी दक्षिण कोरियाची सूत्रे हातात घेतल्यापासून आक्रमक लष्करी धोरण स्वीकारले आहे. याआधी उत्तर कोरियाने केलेल्या क्षेपणास्त्र चाचण्यांना दक्षिण कोरियाने अशारितीने आक्रमक प्रत्युत्तर दिले नव्हते. यावर उत्तर कोरिया कोणती प्रतिक्रिया देतो, याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. उत्तर कोरियाने पुन्हा दक्षिण कोरियाच्या विरोधात आक्रमक कारवाई केली, तर दोन्ही कोरियन देशांमध्ये संघर्ष भडकेल आणि अमेरिका तसेच या क्षेत्रातील इतर देश देखील या संघर्षात ओढले जातील. अमेरिकेने अणुयुद्धाची तयारी केली असून दक्षिण कोरियाबरोबरील अमेरिकेचा युद्धसराव म्हणजे अमेरिकेच्या अणुयुद्धाचा भाग असल्याचा दावा उत्तर कोरियाने नुकताच केला होता. उत्तर कोरियाला त्याला आण्विक प्रत्युत्तर दिल्यावाचून राहणार नाही, असे सांगून उत्तर कोरियाने आपल्या आण्विक धोरणात बदल केले होते. त्यामुळे कोरियन क्षेत्रातील या तणावाकडे सारे जग गांभीर्याने पाहत आहे.

leave a reply