उत्तर कोरियाकडून आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

अमेरिका, दक्षिण कोरिया व जपानचा उत्तर कोरियाला इशारा

South Korea's President Yoon Suk Yeol shakes hands with Japan's Prime Minister Fumio Kishida in Tokyoसेऊल – उत्तर कोरियाच्या लष्कराने गुरुवारी आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सूक येओल जपानमध्ये दाखल होण्याच्या काही तास आधी उत्तर कोरियाने सी ऑफ जपानच्या दिशेने हे क्षेपणास्त्र डागले. त्यामुळे या चाचणीसह उत्तर कोरियाने दक्षिण कोरिया व जपानला धमकावल्याचा दावा केला जातो. दरम्यान, उत्तर कोरियाने कुठल्याही प्रकारे अण्वस्त्रांचा वापर केला तर तो किम जाँग-उन यांच्या राजवटीचा शेवट असेल, असा सज्जड इशारा अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनने दिला.

korea missile largeचीनच्या ‘बीजिंग इन्स्टिट्युट ऑफ इलेक्ट्रॉनिक सिस्टिम इंजिनिअरिंग’चे संशोधख टँग युआन यांनी तयार केलेल्या अहवालानुसार, उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र हल्ले अमेरिकेला सहज लक्ष्य करू शकतात. अमेरिकेच्या हवाई सुरक्षा यंत्रणेत असलेल्या त्रुटिंमुळे उत्तर कोरियाचा आण्विक स्फोटके वाहून नेणारा ‘हॉसाँग-15’ आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अवघ्या 33 मिनिटांमध्ये मध्य अमेरिकेला लक्ष्य करू शकतो. 13 हजार किलोमीटर अंतरापर्यंत मारक क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्राला भेदण्यात अमेरिका अयशस्वी ठरेल, असे युआन यांनी आपल्या अहवालात बजावले.

फेब्रुवारी महिन्यात ‘मॉडर्न डिफेन्स टेक्नॉलॉजी जर्नल’मध्ये प्रसिद्ध झालेला युआन यांचा हा इशारा बुधवारी बातम्यांमधून समोर आला. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये, गुरुवारी उत्तर कोरियाने आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली. राजधानी प्योंगँगमधून सकाळी सातच्यानंतर प्रक्षेपित करण्यात आलेल्या या क्षेपणास्त्राने एक हजार किलोमीटर अंतराचा पल्ला गाठल्यानंतर ‘सी ऑफ जपान’मध्ये कोसळले. उत्तर कोरियाच्या लष्करी हालचालींवर नजर ठेवणाऱ्या दक्षिण कोरिया व जपानने या चाचणीचे तपशील जाहीर केले.

North Korea missile launchदक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष युन सूक येओल जपानमध्ये दाखल होण्याआधी ही चाचणी घेऊन उत्तर कोरियाने इशारा दिला आहे. दक्षिण कोरिया व जपानने उत्तर कोरियाच्या या क्षेपणास्त्र चाचणीवर जोरदार टीका केली. उत्तर कोरियाची अरेरावी सहन केली जाणार नसल्याचे दोन्ही देशांनी जाहीर केले. 12 वर्षानंतर पहिल्यांदाच दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष जपानला भेट देत आहेत. राष्ट्राध्यक्ष येओल यांचे जपानमध्ये लष्करी संचलनात स्वागत करण्यात आले. पंतप्रधान फुमिओ किशिदा यांच्याबरोबरच्या भेटीत द्विपक्षीय सहकार्याबरोबरच गोपनीय माहितीचे आदानप्रदान करण्यावरही चर्चा पार पडली. चीन व उत्तर कोरियापासून वाढत असलेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरिया व जपानच्या राष्ट्रप्रमुखांमधील ही भेट महत्त्वाची ठरते.

दरम्यान, अमेरिका, दक्षिण कोरिया व जपानला अणुयुद्धाची धमकी देणाऱ्या उत्तर कोरियाच्या राजवटीला पेंटॅगॉनने सज्जड इशारा दिला. उत्तर कोरियाने अण्वस्त्रांचा वापर करण्याची तयारी केली तर या देशाची राजवट संपुष्टात येईल, असे पेंटॅगॉनचे प्रवक्ते ब्रिगेडिअर जनरल पॅट रायडर यांनी बजावले.

leave a reply