चीनबरोबरील चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर कोरियाने नव्या क्षेपणास्त्र चाचण्या केल्याचे उघड

- बायडेन प्रशासनाला धक्का

प्योनग्यँग – उत्तर कोरियाने ‘शॉर्ट रेंज मिसाईल सिस्टिम’ची नवी चाचणी घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. चीनबरोबरील सहकार्य अधिक भक्कम झाल्याचे दावे केल्यानंतर अवघ्या २४ तासांमध्ये ही माहिती समोर आली. ज्यो बायडेन यांनी अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर दोन महिन्यांच्या अवधीत उत्तर कोरियाने नवी चाचणी करून बायडेन प्रशासनाला धक्का दिल्याचे मानले जाते.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला भेट देऊन मोठे पाऊल उचलले होते. मात्र दक्षिण कोरियाबरोबरील संरक्षण सहकार्य व इतर मुद्यांच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका व उत्तर कोरियामधील संभाव्य करार फिस्कटला होता. यामागे चीनचा हात असल्याचे आरोपही झाले होते. त्यानंतर गेल्या वर्षाच्या अखेरपासून उत्तर कोरियाने पुन्हा एकदा आपल्या अण्वस्त्र क्षमता वाढविण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे अहवाल समोर आले होते.

या पार्श्‍वभूमीवर, बायडेन प्रशासनाने उत्तर कोरियाच्या ‘डिन्यूक्लिअरायझेशन’साठी प्राधान्य देण्याची घोषणा करून हालचालींना वेग दिला होता. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन आणि संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन यांनी दक्षिण कोरियाला भेट देऊन ‘टू प्लस टू’ चर्चा केली होती. या चर्चेनंतर, उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रांपासून अमेरिका व सहकारी देशांना धोका असल्याचे नमूद करून हा धोका कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी म्हंटले होते. यावेळी अमेरिकेने चीनलाही या प्रयत्नांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते.

त्यानंतर काही दिवसातच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग व उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जॉंग-उन यांच्यात महत्त्वपूर्ण संदेशांची देवाणघेवाण झाल्याचे वृत्त माध्यमांमधून समोर आले होते. या वृत्तानंतर २४ तासांमध्ये उत्तर कोरियाच्या नव्या क्षेपणास्त्र चाचण्यांची माहिती समोर येणे लक्ष वेधून घेणारे ठरते. उत्तर कोरियाने रविवारी या क्षेपणास्त्र चाचण्या केल्या असून त्यात कमी पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्रांचा समावेश आहे, असे सांगण्यात येते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी या चाचण्यांवर प्रतिक्रिया देताना त्या चिथावणीखोर नसल्याचे म्हटले आहे. मात्र अमेरिकी अधिकारी व विश्‍लेषकांनी नव्या चाचण्या म्हणजे बायडेन प्रशासनाला दिलेला धक्का असल्याचे दावे केले आहेत. या चाचण्या म्हणजे गेल्या आठवड्यात पार पडलेल्या अमेरिका व दक्षिण कोरियाच्या संयुक्त सरावाला उत्तर देण्याचा प्रयत्न असल्याचेही विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. जपान व दक्षिण कोरियाच्या माध्यमांनी मात्र रविवारच्या चाचण्या नव्या व आक्रमक चाचण्यांच्या मालिकेची सुरुवात ठरु शकते, अशी भीती व्यक्त केली आहे.

गेल्याच आठवड्यात उत्तर कोरियाने अमेरिकेला धमकावले होते. ‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि त्यांच्या प्रशासनाला पुढील चार वर्षे शांतपणे झोप हवी असेल तर त्यांनी आपला निद्रानाश होईल, अशी कामे करू नये’, अशी धमकी उत्तर कोरियाने दिली होती.

leave a reply