जेरूसलेम – ‘इराण म्हणजे उत्तर कोरियावर राज्य करणारी साधी हुकूमशाही नाही. तर इराण म्हणजे पन्नास उत्तर कोरिया इतका धोकादायक आहे. त्यामुळे इराण अण्वस्त्रसज्ज झालाच तर अमेरिकेतील प्रत्येक शहराला आण्विक ब्लॅकमेलने धमकावू शकतो. अण्वस्त्रसज्ज इराण इतिहास बदलू शकतो’, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी दिला. इस्रायलच नाही तर अमेरिकेसाठी धोकादायक ठरणाऱ्या या इराणबाबत बायडेन प्रशासनाने आपल्या धोरणात बदल करावा, असे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी सुचविले आहे.
अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहातील द्विपक्षीय सदस्यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी इस्रायलला भेट दिली. प्रतिनिधीगृहाच्या इंटेलिजन्स कमिटीचे अध्यक्ष मायकल टर्नर यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या शिष्टमंडळाने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्याशी चर्चा केली. इराणचा अणुकार्यक्रम व इराणसंलग्न दहशतवादी संघटनांपासून इस्रायल तसेच शेजारी अरब देश आणि अमेरिकेला असलेल्या धोक्याची आठवण नेत्यान्याहू यांनी करुन दिली.
बायडेन प्रशासन इराणपेक्षा उत्तर कोरियाच्या धोक्याला सर्वाधिक महत्त्व देत आहे. गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्राध्यक्ष बायडेन तसेच अमेरिकेचे संरक्षणमंत्री, संरक्षणदलप्रमुख दक्षिण कोरियाबरोबर नवनवे युद्धसरावाचे आयोजन करीत आहे. तसेच दक्षिण कोरियाला आण्विक सुरक्षा देण्याबाबत पावले उचलत आहे. या पार्श्वभूमीवर, उत्तर कोरियाच्या तुलनेत इराण सर्वात धोकादायक असल्याचा दावा इस्रायलच्या पंतप्रधानांनी केला.
‘इराणमध्ये कट्टरवादी राजवट आहे. ही राजवट अमेरिकेला मोठा सैतान तर इस्रायलला छोटा सैतान ठरवत आहे’, याकडे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी लक्ष वेधले. असा हा इराण अण्वस्त्रसज्ज बनलाच तर अमेरिकेतील प्रत्येक शहराला आण्विक ब्लॅकमेल करील, असा इशारा नेत्यान्याहू यांनी दिला. इस्रायलबरोबरच अमेरिकेच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरणाऱ्या या इराणविरोधात अमेरिकेने कठोर भूमिका स्वीकारावी, असे आवाहन इस्रायलच्या पंतप्रधानांनी केले.
दोन दिवसांपूर्वी अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाचे सभापती केविन मॅक्कार्थी यांनी इस्रायलचा दौरा केला होता. बायडेन प्रशासनाने इस्रायलच्या पंतप्रधानांना व्हाईट हाऊसच्या भेटीवर आमंत्रित केले नाही, तर मी करीन, अशी घोषणा मॅक्कार्थी यांनी केली होती. तसेच अमेरिकन प्रतिनिधीगृहाचा सभापती असेपर्यंत इस्रायलला इराणविरोधात मिळणाऱ्या सहाय्यात कुठल्याही प्रकारची कपात केली जाणार नसल्याचे मॅक्कार्थी यांनी ठासून सांगितले होते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी इराणबाबत स्वीकारलेल्या मवाळ भूमिकेला लक्ष्य करुन मॅक्कार्थी यांनी ही भूमिका स्वीकारली होती. इस्रायलच्या पंतप्रधानांनी देखील मॅक्कार्थी यांच्या भूमिकेचे स्वागत केले होते. याला काही तास उलटत नाही तोच अमेरिकन प्रतिनिधीगृहाच्या द्विपक्षीय समितीने इस्रायलचा केलेला दौरा लक्षवेधी ठरतो. बायडेन प्रशासनाने इराणबाबत मवाळ भूमिका स्वीकारली असली तरी अमेरिकेचे इस्रायलबाबतचे द्विपक्षीय धोरण बदलणार नसल्याचे संकेत मॅक्कार्थी यांच्या दौऱ्यातून मिळाले आहेत.
दरम्यान, इराणने पाच अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी आवश्यक युरेनियमचे संवर्धन केल्याचा इशारा इस्रायलचे संरक्षणमंत्री गॅलंट यांनी काही तासांपूर्वीच दिला होता. त्यानंतर इस्रायलच्या पंतप्रधानांनी इराणच्या धोक्याची तुलना पन्नास उत्तर कोरियाशी करुन अमेरिकेला इराणपासून संभवणाऱ्या धोक्याची पुन्हा एकदा जाणीव करून दिल्याचे दिसते.
हिंदी