युरोपात कोरोनाच्या बळींची संख्या १० लाखांवर पोहोचली

बु्रसेल्स – युरोप खंडातील कोरोनाच्या साथीत बळी पडणार्‍यांच्या संख्या १० लाखांवर गेली आहे. ब्रिटन व इटली या देशांना कोरोना साथीचा सर्वाधिक फटका बसला असून या दोन्ही देशांमध्ये प्रत्येकी एक लाखांहून अधिक जण दगावले आहेत. रशियातील बळींची संख्याही एक लाखांनजिक पोहोचली असून फ्रान्स, जर्मनी व स्पेनमध्ये ५० हजारांहून अधिक बळी गेले आहेत. या पार्श्‍वभूमीवर युरोपात कोरोना साथीची तिसरी लाट सुरू झाल्याचे दावेही करण्यात येत असून इटली, फ्रान्स, पोलंड यासारख्या प्रमुख देशांनी पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

२०१९ सालच्या अखेरीस चीनमधून सुरू झालेल्या कोरोना साथीची तीव्रता पुन्हा एकदा वाढत असल्याचे समोर येत आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या १२ कोटींवर गेली असून साथीत आतापर्यंत २७ लाखांहून अधिक जण दगावले आहेत. त्यात युरोपिय देशांमधील सर्वाधिक बळींचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी युरोप खंडातील बळींची संख्या १० लाख ६२ झाल्याची माहिती आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिली. युरोपमधील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या ३ कोटी ७२ लाखांवर पोहोचल्याचेही वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीतून उघड झाले.

जागतिक पातळीवर कोरोनामुळे दगावणार्‍यांपैकी ३५.५ टक्के बळी युरोप खंडातील आहेत. तर एकूण रुग्णांपैकी ३०.५ टक्के रुग्ण युरोपिय देशांमध्ये आढळून आले आहेत. युरोपातील सर्वाधिक रुग्ण नोंदविणार्‍या देशांमध्ये रशिया, ब्रिटन, फ्रान्स, इटली व स्पेनचा समावेश आहे. रशियात ४३ लाखांहून अधिक तर ब्रिटनमध्ये ४२ लाख रुग्ण आढळले आहेत. सर्वाधिक बळी जाणार्‍या देशांमध्ये ब्रिटनचा समावेश असून या देशात कोरोनामुळे १ लाख २६ हजारांहून अधिक बळी गेले आहेत. त्यापाठोपाठ इटलीमध्ये एक लाखांहून अधिक जणांचा बळी गेला असून रशियात कोरोनामुळे दगावणार्‍यांची संख्या ९३ हजारांवर गेली आहे.

रुग्ण व बळींची विक्रमी नोंद झालेल्या युरोपिय देशांमध्ये साथीची तिसरी लाट सुरू झाल्याचे दावे करण्यात येत आहेत. फ्रान्समध्ये गेल्या सात दिवसात सरासरी २५ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. तर जर्मनीत प्रत्येकी एक लाख लोकसंख्येमागे ९०हून अधिक रुग्णांची नोंद झाल्याची माहिती या आठवड्यात समोर आली आहे. पोलंडमध्ये गेल्या २४ तासात सुमारे २६ हजार रुग्णांची वाढ झाली असून एकूण रुग्णांची संख्या २० लाखांवर जाऊन पोहोचली आहे. त्याचवेळी जर्मनीच्या वरिष्ठ मंत्र्यांनी तिसरी लाट रोखण्यासाठी युरोपकडे पुरेशा लसींचा साठा उपलब्ध नसल्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, कोरोनाची वाढती तीव्रता रोखण्यासाठी इटली, फ्रान्स, पोलंड यासारख्या प्रमुख देशांनी पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करीत असल्याचे जाहीर केले आहे. फ्रान्समध्ये राजधानी पॅरिससह १५ भागांमध्ये कठोर निर्बंध लागू करण्यात येत असल्याची घोषणा पंतप्रधान जीन कास्टे यांनी शुक्रवारी केली.

leave a reply