नवी दिल्ली – देशातील कोरोनामुळे दगवलेल्यांची संख्या सात हजारांवर पोहोचली असून रूग्णांची संख्या अडीच लाखांच्या पुढे गेली आहे. शनिवार पासून रविवारच्या सकाळपर्यंत देशात या साथीमुळे २८७ जणांचा बळी गेला आणि तब्बल ९,९७१ नवे रूग्ण आढळले. यामुळे देशातील या साथीच्या रुग्णांची दोन लाख ४६ हजारांपर्यंत पोहोचल्याचे आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले. मात्र रविवारी रात्रीपर्यंत देशातील रुग्णांची संख्या २,५५,००० वर पोहोचल्याचे स्पष्ट होत आहे. रविवारी महाराष्ट्रात ९१ जण दगावले तर ३,९०७ नव्या रूग्णांची नोंद झाली. मुंबईत कोरोनामुळे ६१ जणांचा मृत्यू झाला यामुळे राज्यात या साथीने दगवलेल्यांची संख्या तीन हजारांच्या पुढे गेली आहे.
देशात महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि बिहार या दहा राज्यांमध्येच देशातील ८४ टक्के कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तसेच देशात या साथीचे ९५ टक्के बळी याच दहा राज्यांमध्ये गेले आहेत. त्यामध्येही महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यातच ६,३०० जण दगावले आहेत.
रविवारी महाराष्ट्रात आणखी ९१ जण या साथीमुळे दगावले. तसेच ३,००७ नवे रुग्ण आढळले असून राज्यातील एकूण रूग्णांची संख्या ८५,९७५ झाली आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र चीनच्याही पुढे गेला आहे. चीनने आपल्याकडे ८३,०३६ कोरोनाबधित रुग्णांची नोंद झाल्याची अधिकृत माहिती जाहीर केली होती.
महाराष्ट्रात तीन हजार पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून तीस पोलिसांचा या साथीत मृत्यू झाला आहे. पोलिसांमध्ये कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता महाराष्ट्र सरकारने ५५ वर्षांवरील पोलिसांना सुट्टीवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे तसेच आणखी अकरा हजार कैद्यांना पॅरोल देण्यात येणार आहे. राज्यातील ६० कारागृहांमध्ये सुमारे ३८ हजार कैदी बंद होते. यातील ९,६७१ कैद्यांना याआधीच पॅरोलवर सोडण्यात आले होते.
दरम्यान, तामिळनाडूत चोवीस तासात १८ जणांचा बळी गेला आणि १५१५ नवीन रुग्ण आढळले. या राज्यातील एकूण रूग्णांची संख्या ३१,६६७ वर पोहोचली आहे. दिल्लीतील रुग्णसंख्या २७,६५४ वर गेली असून त्यापाठोपाठ गुजरातमध्ये १९,५९२ रूग्ण आतापर्यंत आढळले आहेत. उत्तरप्रदेशातील रूग्णांची संख्या दहा हजारांच्या पुढे पोहोचली आहे.