नवी दिल्ली/मुंबई – चोवीस तासात देशात कोरोनाच्या साथीचे सुमारे ४०० बळी आणि ११ हजार नव्या रुग्णांमुळे चिंता वाढल्या आहेत. शुक्रवार सकाळपर्यंत देशातील कोरोनाने दगावलेल्यांची संख्या साडे आठ हजारांवर पोहोचली आणि एकूण रुग्णांची संख्या २ लाख ९७ हजारांच्या पुढे गेली. तर शुक्रवारी रात्रीपर्यंत देशातील या साथीच्या रुग्ण संख्या ३ लाख ६ हजारांच्या पुढे गेल्याचे स्पष्ट झाले होते. महाराष्ट्र आणि दिल्लीत परिस्थिती अधिकच बिकट झाली असून महाराष्ट्रातील कोरोनाच्या रुग्ण संख्या लाखाच्या पुढे गेली आहे. तसेच दिल्लीतील बिघडत्या परिस्थितीची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. तसेच चाचण्या कमी का करण्यात आल्या, असा जाब सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला विचारला आहे.
शुक्रवारी दिवसभरात महाराष्ट्रात १२७ जण दगावले, तर ३,४९३ नवे रुग्ण आढळले. मुंबईत ९०, ठाण्यात ११ आणि कल्याण डोंबिवलीत तीन जणांचा बळी गेला. महाराष्ट्रात कोरोनाने दगावलेल्यांची संख्या ३,७१७ झाली असून एकूण रुग्णांची संख्या १,०११४१ झाली आहे. देशात आढळलेले ३५ टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आढळले आहेत आणि राज्यात आढळलेल्या या रुग्णांपैकी ५५ टक्के रुग्ण मुंबईत सापडले आहेत. गेल्या आठवडाभरापासून राज्यात दर तासाला पाच ते सहा जणांचा मृत्यू होत आहे. मुंबईतच तासाला तीन जण दगावत आहेत.
महाराष्ट्रानंतर सर्वाधिक रुग्ण संख्या तामिळनाडूत असली, तरी दिल्लीत सर्वाधिक वेगाने रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे दिल्ली सरकारने दररोज होणाऱ्या कोरोनाच्या चाचण्या घटविल्या आहेत. या चाचण्या सात हजारांवरून चार हजारपर्यंत खाली आणण्यात आल्या. तरीसुद्धा दिल्लीत दरदिवशी दीड हजाराहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. तसेच कोरोनामुळे बळी गेलेल्यांच्या मृतदेहांची अहवेलना होत असल्याच्या घटनांवरूनही सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला फटकारले आहे. दिल्लीतील या साथीच्या रुग्णांची संख्या ३५ हजारांवर पोहोचली आहे.
तामिळनाडूतील रुग्ण संख्या ४० हजरांच्या पुढे गेली आहे. शुक्रवारी तामिळनाडूत १८ जणांचा बळी गेला, तर १४७७ नवे रुग्ण आढळले. गुजरातमध्ये कोरोनाने दगावलेल्यांची संख्या १४१६ वर पोहोचली असून एकूण रुग्णांची संख्या २२,५६२ वर पोहोचली आहे.