महाराष्ट्रातील कोरोनाच्या बळींची संख्या पाच हजारांच्या पुढे

नवी दिल्ली/मुंबई – मंगळवारी रात्रीपर्यंत देशात कोरोनामुळे दगावलेल्यांची संख्या ११ हजारांच्या पुढे गेली, तसेच रुग्ण संख्या साडे तीन लाखांच्या पुढे पोहोचली. मंगळवारच्या सकाळपर्यंतच्या चोवीस तासात देशात या साथीने आणखी ३८० जणांचा बळी गेला. त्यामुळे देशातील कोरोनामुळे गेलेल्या बळींची संख्या ९,९२२ पर्यंत पोहोचली. मात्र महाराष्ट्रात मंगळवारी दिवसभरात ८१ जणांचा बळी गेला. तसेच याआधी नोंद न झालेल्या पण कोरोनाच्या १३२८ रुग्णांच्या मृत्यूंची माहितीही राज्य सरकारतर्फे जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनामुळे झालेल्या एकूण १४०९ मृत्यूची नोंद एकाच दिवसात राज्यात झाली असून यामुळे देशातील कोरोनामुळे दगावलेल्यांची संख्या ११ हजारांच्या पुढे गेल्याचे स्पष्ट होते.

Corona-Maharashtraदेशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर संवाद साधला. तसेच यावेळी लॉकडाऊन शिथिल करीत असताना सोशल डींस्टंसिग, मास्क लावणे आधी नियमांचे पालन व्हावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. देशात सोमवारच्या सकाळपर्यंत कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ३ लाख ४३ हजारांच्या पुढे पोहोचली होती. मात्र ही रुग्णसंख्या रात्रीपर्यंत साडे तीन लाखांच्या पुढे पोहोचली आहे.

देशात कोरोनाच्या बळींच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात आधी नोंदविल्या न गेलेल्या मात्र कोरोनाच्या साथीच्या आणखी १३२८ मृत्यूंची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली. यामुळे ही वाढ दिसून आली आहे.गेल्या चोवीस तासात राज्यात ८१ जणांचा बळी गेला, तसेच २७०१ नवे रुग्ण आढळले. मंगळवारी गेलेले ८१ बळी आणि आधीच्या १३२८ मृत्यूंमुळे महाराष्ट्रातील या साथीने दगावलेल्यांची संख्या ५,५३७ वर पोहोचली आहे. तसेच एकूण रुग्णांची संख्या १,१३ ,४४५ झाली आहे. मुंबईत चोवीस तासात ५५ जणांचा बळी गेला, तर आधीचे नोंद न झालेले ८६२ मृत्यू जाहीर करण्यात आल्याने मुंबईतीलच या साथीने दगावलेल्यांची संख्या ३ हजारांच्या पुढे गेली आहे.

leave a reply