भारतातील ‘ओमिक्रॉन’च्या रुग्णांची संख्या १३१ वर

- नव्या व्हेरिअंटचा कम्युनिटी ट्रान्समिशनचा वेग पाहता नीति आयोगाचा इशारा

नवी दिल्ली – कोरोनाचा ‘ओमिक्रॉन’ व्हेरिअंट ८९ देशांमध्ये पोहोचला असून जगात ज्या भागात कम्युनिटी ट्रान्समिशनला सुरूवात झाली आहे, तेथे दीड ते दोन दिवसात रुग्ण दुप्पट होत आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. भारतात कोरोनाचे रुग्ण कमी झाले असले, तरी ‘ओमिक्रॉन’ व्हेरिअंटचे रुग्ण आढळलेल्या राज्यांच्या संख्या ११ वर गेली आहे, तर एकूण रुग्णांची संख्या १३१ वर पोहोचली आहे. शनिवारी ‘ओमिक्रॉन’चे महाराष्ट्रात आठ, कर्नाटकात सहा आणि केरळमध्ये चार नवे रुग्ण आढळले. यामध्ये कर्नाटकात पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्यावर खळबळ माजली आहे. या पार्श्‍वभूमीवर नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी पुन्हा एका इशारा दिला आहे. सध्या ब्रिटन आणि फ्रान्समध्ये ज्या प्रमाणात कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत आहे, तसा उद्रेक भारतात झाल्याचे दिवसाला पुन्हा लाखो रुग्ण आढळू शकतात, अशा शब्दात पॉल यांनी सावधानतेचा इशारा दिला आहे.

भारतातील ‘ओमिक्रॉन’च्या रुग्णांची संख्या १३१ वर - नव्या व्हेरिअंटचा कम्युनिटी ट्रान्समिशनचा वेग पाहता नीति आयोगाचा इशाराभारतात दोन दिवसात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ८७ वरून १३१ वर पोहोचली आहेत. शनिवारी महाराष्ट्रात आठ नवीन रुग्ण सापडले आहेत. यासह दिल्लीत ओमिक्रॉनचे १२ रुग्ण आढळले असून कर्नाटकमध्ये सहा आणि केरळमध्ये ४ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे आता देशातील रुग्णसंख्या १३१ वर पोहोचली आहे. यातील ४८ रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. मुंबईत ओमिक्रॉनचे चार, सातार्‍यामध्ये तीन आणि पुण्यात एक रुग्ण सापडला. सातार्‍यात सापडलेले रुग्ण एकाच कुटुंबातील असून पूर्व अफ्रिकेतून परतले होते. तर मुंबईत आढळलेल्या रुग्णांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते.

कर्नाटकात शनिवारी ओमिक्रॉनचे सहा नवे रुग्ण आढळले, त्यातील पाच हे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. कर्नाटकात दोन महाविद्यालयांमधील ३२ हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यातील पाच जणांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याचे उघड झाल्याने आरोग्य यंत्रणांमध्ये खळबळ माजली आहे.

जगभरात ओमिक्रॉन रुग्णसंख्येत होत असलेली वाढ ही चिंताजनक आहे. ब्रिटनमध्ये एका दिवसात ८८ हजार ४२ नवीन रुग्ण आढळले असून हा आतापर्यंतच उच्चांक होता. तसेच फ्रान्समध्ये ६५ नवे रुग्ण आढळले आहेत. ब्रिटन व फ्रान्समध्ये ज्या वेगाने कोरोनाचा संसर्ग पसरत आहे, त्यावेगाने भारतात संसर्ग पसरल्यास भारतीय लोकसंख्येचा विचार करता दररोज १३ ते १४ लाख नवे रुग्ण आढळू शकतात. ब्रिटनमध्ये ८० टक्के जनतेचे लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, असे असताना तेथे कोरोनाचा नवा उद्रेक झाला आहे. त्यामुळे भारतीय जनतेचा सावध व्हावे. मास्क लावणे, सोशल टिस्टंन्सिंग नियमांचे पालन आवश्यक आहे. गर्दीची ठिकाणे टाळणे, असे आवाहन नीति आयोगाचे सदस्य आणि केंद्र सरकारच्या टास्क फोर्सचे प्रमुख व्ही. के. पॉल यांनी केले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत होत असलेली वाढ पाहता पालिकेने ख्रिसमस आणि ३१ डिसेंबर रोजी होणार्‍या पार्ट्यावर आपले लक्ष वळवले. मैदान, रेसकोर्स, लॉन अशा मोकळ्या जागेवर होणार्‍या पार्टीसाठी तेथील क्षेमतेच्या २५ टक्के आणि जास्तीत जास्त २०० नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे. बंदिस्त जागेत कार्यक्रमासाठी क्षमतेच्या ५० टक्के परवानगी देण्यात आली आहे.

leave a reply