ओआयसी, अरब लीगची इस्रायलवर जोरदार टीका

जेद्दाह – इस्रायलने वेस्ट बँकच्या खलिल प्रांतात चार हजार नव्या वस्त्या उभारण्याची तयारी केली आहे. यावर ‘ओआयसी’ आणि ‘अरब लीग’ या अरब-इस्लामी देशांच्या संघटनांनी टीकास्त्र सोडले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने इस्रायलच्या या कारवायांची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी ओआयसीने केली.

गेल्या आठवड्यात इस्रायलच्या सरकारने वेस्ट बँकमधील याता भागात ज्यू निर्वासितांसाठी चार हजार वस्त्या उभारण्याचे जाहीर केले होते. इस्रायली नागरिकांवरील हल्ले आणि हमासने दिलेल्या धमकीनंतर इस्रायल सरकारने ही घोषणा केली होती. या निर्णयावर ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन-ओआयसी’आणि अरब लीग या दोन संघटनांनी इस्रायलच्या निर्णयावर संताप व्यक्त केला.

पॅलेस्टिनींच्या भूभागात इस्रायलींसाठी वस्त्यांचे बांधकाम करून इस्रायल मानवाधिकारांचे आणि आंतरराष्ट्रीय नियमांचे उघड उल्लंघन करीत असल्याचा आरोप ‘ओआयसी’ने केला. इस्रायलने वेस्ट बँक तसेच जेरूसलेममधीलही बांधकाम ताबडतोब बंद करावे, अशी मागणी सौदी अरेबियाच्या प्रभावाखाली असलेल्या या संघटनांनी केली. तर वेस्ट बँकमध्ये वस्त्यांचे बांधकाम करणाऱ्या इस्रायलला याचे भीषण परिणाम भोगावे लागतील, असा इशारा अरब लीगने दिला.

leave a reply