कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन सबव्हेरिअंट’चा संसर्ग वाढला

- अमेरिकेसह, युरोप व आशियातील रुग्णसंख्येत भर

‘ओमिक्रॉन सबव्हेरिअंट’वॉशिंग्टन/बीजिंग/लंडन – कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन व्हेरिअंट’चा उपप्रकार असलेल्या ‘बीए डॉट२’(इअ.२) या व्हेरिअंटचा जगभरातील संसर्ग वाढू लागल्याची माहिती आरोग्ययंत्रणा व तज्ज्ञांनी दिली आहे. ‘स्टेल्थ व्हेरिअंट’ म्हणून ओळखण्यात येणार्‍या कोरोनाच्या या प्रकारामुळे अमेरिकेसह युरोपिय तसेच आशियाई देशांमध्ये रुग्णसंख्येत मोठी वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. आशिया खंडात दर ४८ तासांमध्ये रुग्णसंख्येत १० लाखांची भर पडत असून एकूण रुग्णसंख्येने १० कोटींचा टप्पा पार केल्याचे सांगण्यात येते.

‘ओमिक्रॉन सबव्हेरिअंट’‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने (डब्ल्यूएचओ) दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांमधील विषाणूंचे ‘सिक्वेन्सिंग’ करण्यात येत असून अशा प्रकरणांमधील ८६ टक्के रुग्णांमध्ये ‘बीए डॉट२’(इअ.२) हा व्हेरिअंट आढळला आहे. अमेरिकेत २६ मार्चपर्यंत आढळलेल्या रुग्णांमध्ये ५४ टक्क्यांहून अधिक जणांमध्ये ‘बीए डॉट२’ हा व्हेरिअंट मिळाल्याचे अमेरिकी आरोग्ययंत्रणा ‘सीडीसी’ने म्हटले आहे. युरोपमधील ब्रिटन, जर्मनी व फ्रान्समध्ये वाढत असणार्‍या रुग्णसंख्येमागेही नवा ‘सबव्हेरिअंट’च कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. आशियाई देशांमध्ये चीन, दक्षिण कोरिया व व्हिएतनाममध्ये कोरोनाचा प्रभाव वाढत असून त्यातही ‘बीए डॉट२’चे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे.

‘ओमिक्रॉन सबव्हेरिअंट’कोरोनाच्या या नव्या व्हेरिअंटमुळे वाढणार्‍या रुग्णसंख्येने आशियातील कोरोना संसर्गाच्या आकडेवारीत मोठी भर टाकली आहे. बुधवारी आशियातील कोरोनाच्या रुग्णसंख्येने १० कोटींचा टप्पा पार केल्याची माहिती स्थानिक यंत्रणा तसेच वृत्तसंस्थांकडून देण्यात आली. यामागे दक्षिण कोरियातील विक्रमी रुग्णसंख्या हा प्रमुख घटक ठरला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून दक्षिण कोरियात दररोज लाखाहून अधिक रुग्ण आढळत आहेत. दक्षिण कोरियातील एकूण रुग्णसंख्या सव्वा कोटींवर गेली असून १५ हजारांहून अधिक जण दगावले आहेत. दरदिवशी भर पडणार्‍या रुग्णसंख्येतील २० टक्क्यांहून अधिक रुग्णसंख्या एकट्या दक्षिण कोरियात आढळत असल्याचे समोर आले आहे.

दक्षिण कोरियापाठोपाठ व्हिएतनाममध्येही दररोज एक लाखांहून अधिक रुग्णांची भर पडत असून एकूण रुग्णसंख्या ९३ लाखांवर पोहोचली आहे. कोरोना साथीचे मूळ ठरलेल्या चीनमध्येही नवा उद्रेक सुरू असून दररोज पाच हजारांहून अधिक रुग्ण आढळत असल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली आहे. चीनने आपल्याकडील उद्रेक रोखण्यासाठी ‘झीरो कोविड पॉलिसी’चा वापर कायम ठेवला असून त्याचे तीव्र पडसाद आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर उमटतील, असे अर्थतज्ज्ञांनी बजावले आहे.

leave a reply