तैपेई/बीजिंग – तैवानवर फक्त तैवानी जनतेचाच अधिकार आहे, असा खरमरीत इशारा राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांनी दिला. तैवानचे अस्तित्त्व आणि तैवानी नागरिकांचा स्वातंत्र्य व लोकशाहीसाठी असणारा आग्रह हा इतर कोणालाही चिथावणी देणारा नाही, असेही राष्ट्राध्यक्षा इंग-वेन यांनी बजावले. चीनमध्ये शी जिनपिंग यांनी कम्युनिस्ट पार्टीचे सर्वेसर्वा म्हणून वर्चस्व मिळविल्यानंतर तैवानमध्ये प्रथमच निवडणूक होत आहे. या निवडणुकीतही चीनच्या दडपणाचा मुद्दा उपस्थित करून राष्ट्राध्यक्षा इंग-वेन यांनी तैवानच्या जनतेला दक्ष राहण्याचे संकेत दिले आहेत.
काही वर्षांपूर्वी तैवानमध्ये झालेल्या निवडणुकीत चीनने सोशल मीडिया तसेच प्रसारमाध्यमे तसेच इतर घटकांचा वापर करून तैवानमधील जनमत बदलण्याचे प्रयत्न केले होते. मात्र चीनचे हे प्रयत्न अपयशी ठरले होते. या अपयशानंतरही चीन तैवानवर ताबा मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असून असे अनेक कट उधळल्याची माहिती तैवान सरकारकडून देण्यात आली होती. चीनचे सर्वेसर्वा शी जिनपिंग यांनी गेल्या महिन्यात झालेल्या कम्युनिस्ट पार्टीच्या अधिवेशनात तैवानच्या विलिनीकरणाचा मुद्दा आक्रमकपणे उपस्थित केला होता. तैवान चीनमध्ये सामील व्हावा यासाठी लष्करी सामर्थ्यासह सर्व पर्यायांचा वापर करण्याचा इशारा जिनपिंग यांनी दिला होता.
या पार्श्वभूमीवर तैवानमध्ये या महिन्यात होणारी निवडणूक लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. चीनशी सलोख्याचे संबंध ठेवावेत, अशी भूमिका मांडणाऱ्या पक्षांचे उमेदवारही निवडणुकीत सहभागी असल्याने चीन त्यात हस्तक्षेप करीत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळेच राष्ट्राध्यक्षा इंग-वेन यांनी आपल्या पहिल्याच सभेत थेट चीनला इशारा देऊन तैवान सरकार चिनी कारवायांविरोधात बेसावध नसल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, शनिवारी चीनच्या 36 लढाऊ विमानांसह तीन युद्धनौकांनी तैवानच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केल्याची माहिती तैवानी संरक्षण विभागाने दिली. गेल्या 12 दिवसात चीनच्या 283 लढाऊ विमानांसह 41 युद्धनौकांनी तैवानच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केला होता, असेही संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले.